पुणे : दुचाकी चोरी आणि घरफोडी प्रतिबंधक कारवाईसाठी गस्त घालीत असताना मिळालेल्या माहितीच्या कोंढवा पोलिसांनी कारवाई करीत दोन पिस्तूल आणि चार जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
तुळशीराम शहाजी उगडे (वय २५, रा. पाण्याच्या टाकी मागे, टिळेकरनगर, मुळ रा. लांडेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, जोतिबा पवार, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले, अभिजीत रत्नपारखी हे परिसरात गस्त घालीत होते. तेव्हा पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना खबऱ्यामार्फत आरोपी उगडे हा येवलेवाडी-खडीमशीन चौकातील पोलीस चौकी जवळील श्रीराम चौक ते इस्कॉन टेम्पलकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबलेला असुन त्याच्या हालचाली संशयास्पद आहेत. त्याच्या कंबरेल पिस्तुलासारखे हत्यार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी कान्हा हॉटेल चौकात सापळा लावला. आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता शर्टच्या पाठीमागे दोन्ही बाजुस एक पिस्तूल व एक गावठी कट्टा खोचलेला आढळून आला. त्याने जिन्स पॅन्टच्या उजव्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत २ जिवंत काडतुसे ठेवलेली मिळाली. तसेच, पिस्तूलाच्या मॅग्झीनमध्ये २ जिवंत काडतुसे आढळून आली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, संजय मोगले, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.