संग्रहित छायाचित्र
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या संपूर्ण कुटुंबाची कशी दादागिरी होती, याचे नवनवे किस्से समोर येत असून गेल्या वर्षी पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामात अडथळा आणला होता. मनोरमा यांनी तीन-चार वेळा मेट्रोच्या वाहनांच्या काचा फोडून काम थांबविले होते. याची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याची माहिती ‘पीएमआरडीए’ चे तत्कालीन आयुक्त व सध्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनाही दिली होती, अशी माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.
औंधमधील नॅशनल सोसायटीत खेडकर कुटुंब राहात असून गेल्या वर्षी रात्री बाणेर रस्त्यावर मेट्रोच्या पिलरवर सिमेंट कॉंक्रिटचे बीम मोठ मोठ्या क्रेनच्या साहाय्याने चढविले जात होते. बाणेरपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या मनोरमा यांना याचा त्रास होत होता. रात्री निट झोप लागत नाही म्हणून त्यांनी चक्क मेट्रोच्या क्रेन, बुलडोझर, अन्य वाहनांच्या काचा फोडल्या. त्याही एक- दोन नव्हे तर चार वेळा काचा फोडण्याचा प्रताप केला होता. याबाबत मेट्रोचे अधिकारी घरी त्यांना समजाविण्यासाठी गेले असता त्यांनाही दमदाटी देऊन त्यांची बोळवण केली. काचा फोडल्याची तक्रार केली. मात्र, माजी सनदी अधिकारी असल्याने पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही माहिती दिवसे यांना त्यावेळी दिली. मात्र, भविष्यात मनोरमा यांची मुलगी पूजा आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकेल यांची त्यांना कल्पना नव्हती. मनोरमा यांना समजाविण्यासाठी अधिकारी गेले तेव्हा त्या काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. उलट त्यांनी दमदाटी देऊन हकालपट्टी केली. वाहनतळावर खेडकर यांच्या मालकीचे व्हीआयपी क्रमांक असलेल्या अनेक आलिशान मोटारी लागल्या होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मनोरमा पीएचडीधारक
मनोरमा खेडकर या पीएचडीधारक आहेत. त्यांनी कोणत्या विषयात पीएचडी केले हा संशोधनाचा विषय आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही उच्च शिक्षित आहेत, तुम्ही मेट्रोच्या काचा का फोडता, असे विचारल्यावर त्यांनी अगदी हास्यास्पद उत्तरे दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.