अर्धवट दुभाजक बनलाय काळ; कॅन्टोन्मेंट व पुणे महानगरपालिकेच्या वादात समस्येकडे दुर्लक्ष
नितीन गांगर्डे
पुणे कॅंटोन्मेंट येथील गोळीबार मैदानाजवळील धोबीघाट येथील रस्त्यावर मागील वर्षभरापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. येथील दुभाजक अत्यंत धोकादायक असून त्यावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. याठिकाणी होत असलेल्या अपघातांचे सत्र रोखण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपायोजना करण्याची मागणी नागरिक सातत्याने करत आहेत. मात्र प्रशासन नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत या समस्येकडे डोळेझाक करत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. सतत होत असलेले रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी स्वारगेट वाहतूक विभागातील पोलिसांनीही प्रशासनाला पत्र पाठवले आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.
धोबीघाट येथील रस्त्यावर मागील वर्षभरात येथे शेकडो छोटे मोठे अपघात झाले आहेत. येथील रस्त्यावर स्वारगेटला जाण्याच्या दिशेला रस्त्याच्या मधोमध दुभाजक आहे. मात्र दुभाजकाची उंची लहान आहे. रस्त्यावर अचानक सुरु होणारे दुभाजक त्यात कमी उंची असल्याने वाहनचालकाला ते दिसत नाही. येथील दुभाजकावरील रंगही नाहीसा झाला आहे. रस्त्याचा रंग आणि त्याचा रंग एकच असल्याने लांब अंतरावरून ते दिसून येत नाही. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिवे नसल्याने रस्त्यावर काळोख असतो. रात्रीच्या अंधारात नवख्या वाहनचालकास माहिती नसते. त्यावेळी रस्त्यावरील वाहनांची रहदारी देखील कमी असते. साहजिकच यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असतो. मात्र दुभाजक लांबून दिसण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नसल्याने वाहनचालका कडून अनवधानाने त्यावर गाडी जाते. त्यावर वाहन अडकेपर्यंत ते नवख्या प्रवाश्यास लक्षातच येत नाही.
दुभाजक दिसत नसल्याने वाहनचालकांकडून त्यावर गाडी जाते. मात्र चढत्या क्रमाने दुभाजकाची उंची वाढत असल्याने त्यावर चारचाकी वाहने अडकत आहेत. नुकतीच दोन दिवसांपूर्वी येथील दुभाजकावर धडकून एक चारचाकी वाहन बराच वेळ अडकून पडले होते. वेगाने धावणारी चारचाकी गाडी अचानक मध्ये आलेल्या दुभाजकवर चढली आणि तशीच अडकून राहिली.
धोबीघाट येथील रस्त्यावर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसतो. प्रकाशाअभावी लांबवरचा रस्ता वाहनचालकांना दिसत नाही. अंधारात हमखास येथे अपघात होतात. अपघात होऊ नये म्हणून येथे विशेष काहीच काळजी घेतली गेली नाही. वारंवार अपघात होत आहेत मात्र उपाययोजना शून्य असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळते. या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत परंतु प्रशासन पुणे कॅन्टोन्मेंट व पुणे महानगरपालिका या दोघांच्या वादात येथील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ऋषिकेश बालगुडे यांनी मिररशी बोलताना सांगितले. त्यामुळे येथे कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही असेही ते म्हणाले.
गोळीबार मैदानाजवळील धोबीघाटा जवळील रस्त्यावर पुरेशा प्रकाश नसतो. तसेच तेथील दुभाजकावरील रंग उडालेला असून ते चढत्या क्रमाने आहे. त्यामुळे चालकांना दिसत नाही. याठिकाणी गतिरोधक नाही. विजेचे दिवे नाहीत, दुभाजक व्यवस्थित पुरेशा उंचीचे बांधून त्याला रंग देण्याची आवश्यकता आहे. या रस्त्याने माझ्या डोळ्यासमोर सात ते आठ अपघात झाले आहेत. तसेच सतत होत असलेल्या अपघात रोखण्यासाठी प्रशासनही काहीच करत नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे बालगुडे यांनी मिररशी बोलताना सांगितले.
याबाबत स्वारगेट वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे मिररशी बोलताना म्हणाले की, धोबीघाट येथील रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना करण्यासाठी कॅंटोन्मेंटन प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. येथे दुभाजकाच्या सुरवातीला एक विजेचा खांब होता. मात्र वाहनाच्या धडकेत तो पडला आहे. तसेच पिवळ्या रंगाचे बोलार्डही येथे बसवण्यात आले होते. मात्र तेही वाहनांच्या धडकेने नाहीसे झाले आहेत.