बारामतीमधून हृदयद्रावक घटना...
पुणे : बारामतीमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार (दि.१२) वाणेवाडी, ता. बारामती येथे घडली. ट्रॅक्टर वेगात असताना सांगसिंह हा खाली पडला त्यावेळी ट्रॅकटरलाच जोडलेल्या दोन ट्रॉलीची चाके त्यांच्या अंगावरून गेली. सांगसिंह दीपसिंह सिंह (वय- १७, सध्या रा- करंजेपूल, ता- बारामती तर मूळ रा- पद्रोडा, ता- भनियाना, जि- जैसलमेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानहून फर्निचरची कामे करण्यासाठी सांगसिंह हा बारामतीत आला होता. फर्निचरची कामे करणारा चतुर सिंग या ठेकेदाराकडे सेतीराम सेन (वय-१८) आणि सांगसिंह सिंह हे तरुण मदतीसाठी होते. रविवारी सेतीराम आणि सांगसिंह कामासाठी करंजेपूलहून वाणेवाडीला चालत निघाले होते. दरम्यान सोमेश्वर कारखान्याजवळ पोहोचलेले असताना पाठीमागून आलेल्या एका ट्रॅक्टरला त्यांनी हात केला. ट्रॅक्टर थांबल्यावर दोघेही ट्रॅक्टरवर बसले. ट्रॅक्टर भरधाव वेगाने चाललेला असताना वाणेवाडीनजीक कन्नडवस्ती येथे सांगसिंह हा अचानक खाली डांबरी रस्त्यावर पडला आणि दोन्ही ट्रॉलीची चाके त्याच्या अंगावरून गेली. ट्रॅक्टर थांबवून सेताराम धावला. परंतु, तोपर्यंत सांगसिंहची हालचाल बंद झाली होती.
या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसर वाणेवाडी बाजूला फरार झाला होता. दरम्यान सांगसिंहला खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.