संग्रहित
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक कामांची पाहणी केली. तसेच, माध्यमांशी संवाद साधत राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले. परंतु, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सवाल उपस्थित केला असता अजित पवार भलतेच भडकले. त्यांनी राजीनाम्याच्या प्रश्नावर उत्तर देताना पत्रकारालाच उलट सवाल उपस्थित केला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय नेत्यांकडून मागणी होत आहे. मात्र, अजित पवार मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आज पुणे दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देशमुख हत्याप्रकरणासंदर्भात विचारले असता. प्रतिक्रिया देताना पवार चिडले. किती वेळा तेच तेच सांगायाचे. संतोष देशमुख खूनप्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
पवारांच्या उत्तरानंतर एका पत्रकाराने पुन्हा प्रश्न उपस्थित केला. तापर्यंत ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे गेले आहेत. पण, तुम्ही त्यांना पाठीशी घालता, असा आरोप होत आहे, असे विचारताच, पवार भडकले, ‘तुझी चौकशी कधी होईल. तुझं नाव आल्यावरच ना. एखाद्या प्रकरणात तुझं नावच नसेल, तर तुझी चौकशी काय बळबळं करतील काय रे. काय तुम्हीपण...अशी संतप्त भावना अजितदादांनी व्यक्त केली.