संग्रहित छायाचित्र
राज्य शासनाच्या टीआरटीआय, बार्टी, महाज्योती आणि सारथी या संस्थांच्या माध्यमातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण दिले जाते. या संस्थांच्या माध्यमातून खासगी क्लासचालकांची निवड करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे धोरण सरकारने आखले आहे. प्रशिक्षण देण्याच्या बदल्यात या संस्थांकडून संबंधित क्लासचालकाला आर्थिक मोबदला दिला जातो. हाच मोबदला लाटण्यासाठी संस्थांचे प्रमुख आणि खासगी क्लासचालकांनी साटेलोटे करून टक्केवारीचे समान धोरण सुरू असल्याचा आरोप आता विद्यार्थ्यांनी केला आहे.
राज्य शासनाकडून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देऊन उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी विविध समाजासाठी संस्थांची स्थापना केली आहे. टीआरटीआय, बार्टी, महाज्योती आणि सारथी अशा संस्था विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. या संस्थांना राज्य शासनाकडून निधी दिला जातो. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी या संस्थांकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेत प्रवेश दिला जातो होता. त्या बदल्यात खासगी संस्थांना पैसे दिले जात होते. परंतु या प्रक्रियेत केवळ काही मोजक्याच खासगी क्लासचालकांना सातत्याने टेंडर दिले जात असल्याची माहिती समोर आली होती. तसेच या क्लासचालकांमधून संस्थाचालकांना वरिष्ठ पातळीवर टक्केवारीचा मलिदा दिला जात होता.
ही बाब राज्य शासनाच्या लक्षात येताच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने टेंडर प्रक्रियेसाठी समान धोरण राबविण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी समान धोरण समिती नेमण्यात आली आहे. त्यानुसार टीआरटीआयचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना करण्यात आली होती. उपसमितीने स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी अतिशय पारदर्शकपणे टेंडर प्रक्रिया पार पाडली व त्यानुसार मोठ्या संख्येने नामांकित संस्था पात्र झाल्या व विशेष म्हणजे कोणत्या संस्थेत कोचिंग घ्यायचे हे निवडण्याचा अधिकार उपसमितीने विद्यार्थ्यांना दिला. समान धोरणामुळे काही नव्या खासगी क्लासचालकांना या प्रक्रियेत सहभागी होता आले. यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना क्लास निवडण्याचे अधिक पर्याय उपलब्ध झाले. परंतु यामुळे जुन्या क्लासचालकांच्या मक्तेदारीला धक्का बसला. म्हणूनच या क्लासचालकांनी संस्थाचालकांना हाताशी धरून विद्यार्थ्यांची माहिती, त्यांचे संपर्क क्रमांक मिळवत थेट विद्यार्थ्यांना आपल्या क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी आमिषे दाखवण्यास सुरुवात केली.
या आमिषाला संस्थाचालकांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचा आरोप आता विद्यार्थ्यांसह विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित संस्थांना तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोणत्याही संस्थाचालकांनी एकाही क्लासचालकाला जाब विचारण्याचे धाडस दाखवले नाही. उलट डोळ्यांना पट्टी आणि कानावर हात ठेवणे पसंत करून एकप्रकारे मुकसंमती दिली असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. सध्या विद्यार्थ्यांनी संबंधित क्लासमध्ये प्रवेश घेतले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे राज्य सरकारने या क्लासचालकांनी तपासणी केल्याशिवाय प्रशिक्षणापोटी देण्यात येणारे शुल्क त्यांना अदा करू नये असा निर्णय घ्यावा, अशीही मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा आर्थिक लाभासाठी महाज्योतीला समान धोरणाची ॲलर्जी
समान धोरण समितीच्या माध्यमातून टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी धोरण आखण्यात आहे. या समान धोरणात सारथी, बार्टी आणि टीआरटीआय या संस्था सहभागी झाल्या. परंतु या समान धोरणातून महाज्योती या संस्थेने बाहेरच राहणे पसंत केले आहे. महाज्योती सोडून इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांना खासगी क्लास निवडण्यासाठी १२ ते १४ पर्याय उपलब्ध झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हव्या त्या क्लासला प्रवेश घेता आला. परंतु महाज्योतीकडे पहिल्यापासून नोंदणी असलेलेच खासगी क्लासचालक राहिले. विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा खासगी क्लासचालकांचेच आर्थिक हित जोपासले जात आहे. तसेच हा आर्थिक मलिदा महाज्योतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाटला जात आहे, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी केला आहे. काही संघटनाचालक याचा आधार घेता खासगी क्लासचालक आणि महाज्योतीच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरत असल्याच्याही तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत.
स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा आणि क्लासचालकांनी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी लवकरच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे केली जाणार आहे. महाज्योतीने ज्या क्लासला टेंडर दिले नाही अशा क्लासला बाकीच्या संस्थांचे टेंडर देण्यात आले. या संस्थांनी नियम अटीमध्ये शिथिलथा का केली?. वार्षिक उलढाल कमी असताना त्यांना टेंडर का देण्यात आले? सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या पैशावर हे क्लासचालक आणि संबंधित अधिकारी करोडी रुपयांचा मलिदा लाटत आहेत. सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआयमधील पूर्व प्रशिक्षण बंद करण्यात येऊन फक्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी.
- महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
टीआरटीआय, बार्टी आणि सारथी या संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पूर्व प्रशिक्षणासाठी खासगी क्लासचालकांची निवड करणे या संस्थांच्या प्रमुखांच्या मान्यतेने त्यांना पॅनेलवर घेण्याचे मुख्य काम केले जाते. एकदा ही प्रक्रिया पार पडली की संपूर्ण जबाबदारी ही संबंधित संस्थांची आहे. खासगी क्लासचालकांकडून आमिषे दाखवली जात असतील तर त्याबाबत तक्रार आल्यानंतर त्या त्या संबंधित संस्थेने कारवाई करणे अपेक्षित आहे. टीआरटीआयबद्दल अद्याप एकाही विद्यार्थ्याची तक्रार आली नाही. हजेरीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ आम्ही क्लासचालकांची झाडाझडती घेतो.
- डॉ. राजेंद्र भारुड, समान धोरण उपसमिती, अध्यक्ष, टीआरटीआय