'सभांना पूर्वपरवानगी अनिवार्य' करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परिपत्रकाविरुद्ध विद्यार्थ्यांचे आंदोलन
पुणे (१३ जानेवारी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) ३० डिसेंबर २०२४ रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते. या परिपत्रकात विद्यापीठ परिसर, अहिल्यानगर उपकेंद्र व नाशिक उपकेंद्र येथे कोणत्याही प्रकाराच्या सभा, बैठका, आंदोलने आणि इतर कार्यक्रमांसाठी विद्यापीठ प्रशासनाची किमान आठ दिवस आधी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
विद्यापीठ प्रशासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर गदा निर्माण करणारा असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. त्यांनी या परिपत्रकाचा विरोध केला असून, विद्यापीठ प्रशासनाला हे परिपत्रक तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यापीठामध्ये सर्व शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या पक्ष संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन (Student Protest) करण्यात आले.
जर विद्यापीठाने (SPPU) हे परिपत्रक मागे घेतले नाही, तर २६ जानेवारीपर्यंत सातत्याने आंदोलन चालवले जाईल, असा इशारा विविध विद्यार्थी संघटनांनी दिला आहे
सोमवारी झालेल्या आंदोलनात राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे सिद्धांत जांभुळकर, हुजेबा शेख, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे सुलतान शहा, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे मयुर जावळे, समाधान दुपारगुडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रोहीत भोसले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अजय पवार, अमन बागवान, युवक क्रांती दलाचे मुस्कान, नव समाजवादी पर्यायाचे निहारीका भोसले आणि इतर अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जर हे काळे परिपत्रक मागे घेतले नाही तर २६ जानेवारी रोजी कुलगुरू यांच्या हस्ते ध्वजारोहण आम्ही राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने होऊ देणार नाही. आंदोलन, मोर्चा करणे हे विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांचा संविधानिक अधिकार आहे.
- अक्षय कांबळे (राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस)
आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आज सर्व शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेच्या विद्यार्थी संघटनांनी एकत्रित आंदोलन केले आहे. येणाऱ्या काळात जर हे परिपत्रक रद्द झाले नाही तर आम्ही संविधानिक मार्गाने आमचा विरोध नोंदवत राहू.
- सुल्तान शहा (भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन)