Accident News : पटवर्धन बागेत भरधाव कारचा थरार, तीन मुलींना उडवले

ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी पाषाणवरुन एरंडवणे येथील पटवर्धन बाग परिसरात आलेल्या एका महिलेने तिच्या कारचा 'यु टर्न' घेत असताना थेट पदपथावर गाडी चढवत तीन मुलींच्या अंगावर गाडी घातली. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या अपघातात क्लासला निघालेल्या तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Sat, 4 Nov 2023
  • 10:38 pm
Accident News : पटवर्धन बागेत भरधाव कारचा थरार, तीन मुलींना उडवले

पटवर्धन बागेत भरधाव कारचा थरार, तीन मुलींना उडवले

महिला चालकाने चढवली कार पदपथावर: अपघातग्रस्त मुली गंभीर जखमी

पुणे : ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी पाषाणवरुन एरंडवणे येथील पटवर्धन बाग परिसरात आलेल्या एका महिलेने तिच्या कारचा 'यु टर्न' घेत असताना थेट पदपथावर गाडी चढवत तीन मुलींच्या अंगावर गाडी घातली. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या अपघातात क्लासला निघालेल्या तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी लाईफ कोच म्हणून काम करणाऱ्या आणि एका पीआर कंपनीच्या मालकीण असलेल्या चालक महिलेला ताब्यात घेतले आहे.

वर्षा मराठे (रा. पाषाण) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेत हर्षदा, महिमा आणि रसिका या तीन शाळकरी मुली जखमी झाल्या आहेत. मराठे या पाषणला राहण्यास आहेत. त्यांची दुपारी एरंडवणे येथील पटवर्धन बागेत असलेल्या एका ब्युटी पार्लरमध्ये अपॉईंटमेंट होती. त्याकरिता त्या त्यांची मोटार घेऊन या भागात आल्या होत्या. पार्किंगसाठी जागा शोधत असताना त्यांनी गुळवणी रस्त्यावर यू टर्न घेतला. रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावरून हर्षदा, महिमा आणि रसिका पायी चालत जात होत्या. त्या दुपारी क्लासवरुन घराकडे परत निघालेल्या होत्या. वेगात असलेल्या मराठे यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार काही कळायच्या आतच पदपथावर चढली आणि थेट या तीन मुलींना धडकली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी या मोटारीखाली तीन मुली चिरडल्याचे सांगितले. एक मुलगी गाडीखाली अडकली होती. या मुलीला नागरिकांनी गाडी वर उचलून बाहेर काढलं. अपघातानंतर सर्व मुली वेदनेने विव्हळत होत्या. तेव्हा ही महिला गाडीमधून खाली देखील उतरली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या प्राची पवार यांनी फेसबुकवर अपघाताबाबत केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

अपघात झाल्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी या महिलेने आपण अजिबात वेगात नव्हतो. आपण अनेक वर्ष गाडी चालवत असून हा अपघात चुकून घडल्याचे सांगितले. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, एक मुलगी गाडीखाली अडकली यांचे त्यांना गांभीर्य नव्हते. मुलींना किती लागले आहे? त्यांना कोणत्या हॉस्पिटलला नेण्यात आले आहे? याची त्यांनी साधी चौकशी देखील केली नाही. सर्व जखमी मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यासंदरभात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे म्हणाले की, एरंडवणे येथे गुळवणी रस्त्यावर असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये अपॉइंटमेंट असल्याने गुळवणी महाराज रस्त्यावर ही महिला आली होती. यू टर्न घेत असतानाच त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून ही मोटार पदपथावर चढली. या अपघातात जखमी झालेल्या तीनपैकी दोन मुलींची प्रकृती  धोक्याबाहेर आहे. एका मुलीच्या जबड्याला जबर दुखापत झाली आहे. तिच्या कॉलर बोनला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी मुलींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तक्रार आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest