आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या तिघांना कोंढवा येथे पकडले
#कोंढवा
सध्या देशात इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलचा हंगाम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच आयपीएल अखेरच्या टप्प्यात आल्याने क्रिकेटप्रेमींचे सट्टा लावण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोंढवा येथील साईबाबानगरमधील धनश्री सिग्नेचर सोसायटीत एका फ्लॅटमध्ये बेटिंग घेणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे वसीम हनीफ शेख (रा. कोंढवा), इक्रमा मकसुद मुल्ला (रा. घोरपडी पेठ), मुसाबित मेहमुद बाशाइब (रा. सोमवार पेठ) अशी आहेत. खंडणी विरोधी पथकाने आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलवर मोठ्या प्रमाणात सट्टा घेतला जात असल्याची माहिती कळाली. तपासावेळी खंडणी विरोधी पथकाला कोंढवा येथे एका फ्लॅटवर बेटिंग सुरू असल्याचे समजले. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने कारवाई करत फ्लॅटवर छापा टाकला. या वेळी पाच मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच कारवाईमध्ये तीन आरोपींनाही अटक केली. या तिघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.