संग्रहित छायाचित्र
शहरात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. बालेवाडी भागातील एका सोसायटीतील सदनिकेत घरफोडी करण्यासाठी आलेला चोरटा पहिल्या मजल्यावरून पडल्याचा प्रकार समोर आला आहे. पंधरा ते वीस फुटावरून चोरटा सोसायटीच्या आवारात पडल्याने जखमी झाला. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बप्पा सरकार (वय ३२, सध्या रा. मुंबई) असे जखमी झालेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका रहिवाशाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्याला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बालेवाडी भागातील इयॉन सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीत पहिल्या मजल्यावरील सदनिकेत ते राहायला आहेत.
गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास सरकार सोसायटीच्या आवारात शिरला. सोसायटीतील पाइपच्या आधारे तो पहिल्या मजल्यावर असलेल्या सदनिकेतील गॅलरीत उतरला. आवाज झाल्याने तक्रारदार झोपेतून जागे झाले आणि त्यांनी गॅलरीतून डोकावून पाहिले.
फिर्यादी जागे झाल्याचे पाहून चोरटा पाइपवरून उतरून पसार होण्याचा प्रयत्नात असताना तो पंधरा ते वीस फुटावरून सोसायटीच्या आवारातच खाली पडला. त्यात तो जखमी झाला. चोरट्याला बघून फिर्यादीने सोसायटीतील रहिवाशांना जागे केले. सुरक्षारक्षकाने तत्काळ चोरट्याला पकडले. रहिवाशांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील चोरट्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाळले करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.