पुणे : ते पुन्हा आले अन् वाहतूक कोंडी करुन गेले; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने पुण्यात वाहतूक कोंडी
पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे पणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ऐरवी शहरात वाहतूक कोंडीने श्वास कोंडला जातो. शनिवारी अनेकांना सुट्टी असल्याने नागरिका बाहेर पडले होते. रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात गर्दी झाली होती. परिणामी, नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक, खंडुजीबाबा चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन महाविद्यालय), डेक्कन परिसरात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. रस्त्यांवर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. या वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
संध्याकाळी खराडी बायपास रस्त्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. त्यावेळी या रस्त्यावरील मॉलमध्ये सुट्टीच्या निमित्ताने फिरण्यासाठी आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा ताफा जाई पर्यंत अडकून पडावे लागले. त्यामुळे या रस्त्यावर संध्याकाळी सात ते आठ या वेळेत वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, आपटे चौकात सांडपाण्याच्या भूमिगत वाहिन्यांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. तसेच सांडपाण्याच्या वाहिन्या आणि इतर साहित्य पदपथांवरच ठेवण्यात आले आले. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरील अडथळे ओलांडून मार्ग काढावा लागला. मुख्यमंत्र्यांचा दौरा असूनही वाहतुकीचे नियोजन नसल्याचा फटका वाहनचालक आणि पादचाऱ्यांना बसल्याचे दिसून आले.
पुणे शहरात मुख्य समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आहे. पुण्यात बड्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. तसेच व्हीआयपी दौरे वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात पथ विभाग अद्यापही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पुण्याला आता चार मंत्रीपदे मिळाली आहेत. तर एक केंद्रीय मंत्रीपद आहे. त्यामुळे मंत्र्यांचे दौरे आणि ताफा पुण्यातूनच जाणार आहे. या पुढील काळात या मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी पुणेकरांनी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.