Train accident : अतिभारामुळे होणारा रेल्वे अपघाताचा धोका टळणार

मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे डबे घसरल्याच्या घटना घडल्याच्या बातम्या आपण ऐकतो. मालवाहतुकीचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणून रेल्वेला पहिली पसंती दिली जाते. मात्र रेल्वेच्या वाघिणीतील अतिरिक्त वजनामुळे बऱ्याच वेळा डबे रुळावरून घसरण्याची शक्यता असते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Fri, 19 May 2023
  • 12:57 am
अतिभारामुळे होणारा रेल्वे अपघाताचा धोका टळणार

अतिभारामुळे होणारा रेल्वे अपघाताचा धोका टळणार

सेन्सरवर आधारित वजन मोजणी यंत्र देणार वाघिणीतील अतििरक्त मालाची सूचना, अतिरिक्त भारामुळे डबे रुळावरून घसरण्याचे प्रमाण घटणार

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे डबे घसरल्याच्या घटना घडल्याच्या बातम्या आपण ऐकतो. मालवाहतुकीचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणून रेल्वेला पहिली पसंती दिली जाते. मात्र रेल्वेच्या वाघिणीतील अतिरिक्त वजनामुळे बऱ्याच वेळा डबे रुळावरून घसरण्याची शक्यता असते. असे अपघात टाळण्यासाठी रेल्वे विभाग तंत्रज्ञानाची मदत घेत आहे. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकात सेन्सरवर आधारित वजन मोजणी यंत्राची चाचणी सुरू करण्यात आली आहे. या सेन्सरमुळे वाघिणीतील वजन क्षमतेपेक्षा जास्त झाल्यास इशारा देणारा अलार्म वाजणार आहे. त्यामुळे वाघिणीमध्ये भरलेला अतिरिक्त वजनाचा माल वेळीच काढून घेता येणार आहे. त्याचबरोबर संभाव्य अपघातच नव्हे तर रेल्वेचे कोलमडणारे वेळापत्रकही सुधारण्यास मदत होणार आहे. हा पथदर्शी प्रयोग यशस्वी झाल्यास  देशभरात या यंत्रांचा वापर केला जाणार आहे.

भारतीय रेल्वेचे देशभर जाळे असून, दररोज ३३ लाख टन मालाची ने-आण रेल्वेच्या माध्यमातून होते. देशाच्या कानाकोपऱ्यात फळे, भाजीपाला या नाशवंत मालाबरोबरच औद्योगिक कच्चा माल, टपाल आणि विविध प्रकारचा माल देशातील कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी रेल्वेचा उपयोग केला जातो. देशभरात कामानिमित्त स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या खासगी वाहनांपासून इतर सामानांची ने-आण करण्यासाठी रेल्वेच्या मालवाहतूक सेवेचा उपयोग केला जातो. मालगाड्यांच्या माध्यमातून केवळ औद्योगिक अथवा व्यावसायिक कच्च्या मालाची ने-आण केली जाते. 

प्रवासी ट्रेनला जोडल्या जाणाऱ्या डब्यांना ४ टन क्षमतेचे मालवाहतूक करणारे डबे जोडले जातात. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्यास रेल्वे रुळावरून घसरण्याचा धोका असतो. तर, अनेकदा रेल्वेचे आवश्यकतेनुसार इंजिन बदलले जाते. त्यावेळी अतिरिक्त वजनामुळे रेल्वेचे इंजिन बदलण्यात अडचणी येतात. इंजिन आणि बोगीला जोडण्यात येणाऱ्या  भागाचे अलाईनमेंट बदलते. अशावेळी अतिरिक्त वजन कमी करावे लागते. त्यामुळे वेळ जातो. शिवाय अतिरिक्त वजनामुळे काढावे लागणारे पार्सल पुढे इच्छित स्थळी पोचण्यास वेळ लागतो. ग्राहकांनाही त्याचा नाहक त्रास होतो. हा ताण कमी करण्यासाठी रेल्वेने सेन्सरवर आधारित वजन मोजणी यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बोगीत माल भरतानाच त्याच्या क्षमतेनुसार भरले जाणे शक्य होणार आहे. अतिरिक्त वजन झाल्यास तसा इशारा देणारा अलार्म वाजेल. परिणामी गाडी सुरू होण्यापूर्वीच पार्सलची दक्षता घेणे शक्य होईल.

रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे म्हणाले, वॅगनमध्ये अतिरिक्त वजन झाल्यास रेल्वे रुळावरून घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंजिन बदलताना अडचणींचा सामना करावा लागतो. मध्यंतरी पुण्यात असाच प्रकार झाला होता. त्यावेळी अतिरिक्त वजन कमी केल्यानंतर इंजिन बदलणे शक्य झाले. सध्या पुण्यातून दररोज ७० वाहनांची ने-आण केली जाते. अतिरिक्त वजन झाल्यास काही पार्सल उतरवावे लागते. हा सगळा व्याप टाळण्यासाठी सेन्सरवर आधारित वजन मोजणी यंत्राची अलार्म सिस्टीम बसवली जाणार आहे.

पुढील सहा ते आठ महिने या सेन्सरची चाचणी पुणे रेल्वे स्थानकात घेतली जाईल. त्यानुसार देशभरात हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला जाईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात मालगाड्यांमध्ये देखील अशाच पद्धतीची प्रणाली वापरण्याचा विचार आहे.

-डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे पुणे विभाग

असे आहे भारतीय रेल्वेचे जाळे

भारताची रेल्वेमार्गाची लांबी ६७,४१५ किलोमीटर आहे. रेल्वेतून दररोज २.३१ कोटी प्रवासी प्रवास करतात. तर, दररोज ३३ लाख टन मालाची वाहतूक केली जाते. फळे, भाजीपाला, सिमेंट, कोळसा, औद्योगिक कच्चा माल, वाहने अशा सर्व प्रकारच्या पार्सल अथवा मालाची वाहतूक रेल्वेमार्फत केली जाते. रेल्वेकडे १२,१४७ इंजिन, ७४ हजार प्रवासी डबे आणि २ लाख ९० हजार वाघिणी आहेत. दररोज ८ हजार ७०० प्रवासी गाड्यांसह साडेतेरा हजार गाड्या धावतात. याशिवाय रेल्वेचे २३०० मालधक्के आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest