विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रगती : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

भारताच्या विकासासाठी समाजातील सर्व घटकांना सक्षम करणे आवश्यक आहे. देशाचा विकास हा फक्त सेवेपुरता मर्यादित नाही. तर सेवेतून नागरिकांना विकासक्षम बनवायला हवे. अशा विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रगती होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 18 Dec 2024
  • 03:49 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भागवत यांच्या हस्ते राज्यस्तरीय दिव्यांग शिबिराचे उद्घाटन

भारताच्या विकासासाठी समाजातील सर्व घटकांना सक्षम करणे आवश्यक आहे. देशाचा विकास हा फक्त सेवेपुरता मर्यादित नाही. तर सेवेतून नागरिकांना विकासक्षम बनवायला हवे. अशा विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रगती होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

खराडी येथील ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी येथे आयोजित ‘भारत विकास परिषद विकलांग केंद्रा’च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यानिमित्त राज्यस्तरीय मोफत दिव्यांग शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये तब्बल १२०० दिव्यांगांना मॉड्युलर कृत्रिम हात व पाय बसविण्यासाठी मोजमाप घेण्यात येत आहे. 

सरसंघचालक पुढे म्हणाले, “काही अंशी अहंकार ही माणसाला कार्य प्रवृत्त करण्यास आवश्यक प्रेरणा ठरते. परंतू, त्या पलीकडे नेते ती शाश्वत प्रेरणा असते. ती प्रेरणा चिरंतन असते. त्यातून निर्माण होणारा सेवाभाव म्हणजे सेवानिष्ठांची मांदियाळी होय. आपलेपणाचा स्त्रोत एकसारखाच असतो त्यातून लोकोत्तर प्रेरणेने सेवा घडते. सेवा करण्याची प्रवृत्ती सेवितात सुद्धा निर्माण होते. सेवित सुद्धा सेवा करणारे बनतात. हृदयस्थ नारायण आहे तो हे घडवून आणतो.”

यावेळी कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता चितळे, सचिव राजेंद्र जोग, केंद्र प्रमुख विनय खटावकर, ढोलेपाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात निता ढेकणे, शशिकांत बोरसे, अर्जुन सोनावणे, अनिकेत गाडेकर, वैजनाथ गोरख आणि नासिर शेख या दिव्यांगांना अत्याधुनिक मॉड्यूलर पाय प्रातिनिधीक स्वरूपात प्रदान करण्यात आले. मॉड्यूलर फूटबद्दल सुमित भौमिक यांनी तांत्रिक माहिती दिली  

दिव्यांग केंद्राला आर्थिक मदत करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, ब्रिज नेक्स्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, ऑटो हॅंगर, वात्सल्य ट्र्स्टच्या प्रतिनिधींचा सरसंघचालकांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमात विनय खटावकर यांना पहिल्या ‘दिव्यांग मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन, तर दत्ता चितळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भक्ती दातार यांनी वैयक्तिक गीत सादर केले आणि राजेंद्र जोग यांनी आभार मानले.

दिव्यांग सैनिकांचा सन्मान

भारतीय सैन्यात सेवा बजावलेले सैनिक ज्यांनी पॅरॉलॉंपिक खेळात विशेष कामगिरी बजावली आहे अशा सैनिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये विजयकुमार कारकी, चार सुवर्ण पदक विजेते व्हिलचेअर बास्केट बॉल चॅम्पियन मीन बहाद्दूर थापा आणि एअरक्राफ्ट्समन मृदूल घोष यांचा सन्मान करण्यात आला. 

गिनिज बुक रेकॉर्डचा प्रयत्न

दिव्यांगांना एका शिबीरात आत्तापर्यंत ७१० कृत्रिम पाय बसविण्याचा विश्व विक्रम आहे. तो मोडित काढत एक हजार २०० दिव्यांगांना मॉड्यूलर पाय बसविण्याचा विक्रम भारत विकास परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक नोंदणी झाली असून, मार्च २०२५ मध्ये एक हजार २०० कृत्रिम पाय बसविण्यात येणार आहे. त्यानंतर गिनिज बूक रॅकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

समाजात सर्वकाही वाईट चालल्याची भावना निर्माण झाली आहे. पण प्रत्यक्ष वाईटाहून ४० पट अधिक चांगले सेवाकार्य समाजात चालू आहे. त्याचा प्रसार होणे गरजेचे आहे. कारण सेवेमुळेच समाजात शाश्वत विश्वास निर्माण होतो.

- मोहन भागवत, सरसंघचालक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest