संग्रहित छायाचित्र
महापालिका (Pune Municipal Corporation) शहरातील तब्बल चाळीस पुलांची स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे प्राधान्यक्रमाने दुरुस्ती करणार आहे. दुसरीकडे ब्रिटिशकालीन संगमावरील वेलस्ली पूल, कुंभारवाड्यासमोरील डेंगळे पूल, लकडी पूल (संभाजी पूल), शनिवारवाड्यासमोरील शिवाजी पूल, होळकर पूल असे पूल शंभर ते सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक काळानंतरही मजबूत आहेत.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले पूल १०-१५ वर्षांत दुरुस्तीला येतात. त्यामुळे पुलासाठी वापरलेले सिमेंट आणि स्टीलच्या प्रमाणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरात नवीन पूल व ग्रेडसेपरेटरचे प्रकल्प होत असताना पालिकेने या वर्षीच्या अर्थसंकल्पात १० वर्षांपेक्षा अधिक काळातील तब्बल ४० पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. या ऑडिटनुसार महापालिका प्राधान्यक्रमाने दुरुस्ती करणार आहे. यासाठी साहजिकच कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे. ही वस्तुस्थिती असताना दुसऱ्या बाजूला ब्रिटिशकालीन शंभर ते सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक काळाचे शनिवारवाड्यासमोरील शिवाजी पूल, कुंभारवाड्यासमोरील नवा पूल, होळकर पूल अजूनही मजबूत आहेत. त्यामुळे महापालिका बांधत असलेल्या पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणारे मुख्यत: सिमेंट आणि स्टीलचे प्रमाण, गुणवत्तेबाबत सर्वसामान्य नागरिकांना शंका येत आहे.
महापालिकेने संपूर्ण पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करून प्रकल्प आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारच्या रस्तासुरक्षा अभियानाअंतर्गत २०१८ मध्ये शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे ‘रोड सेफ्टी ऑडिट’ केले होते. त्या सर्वेक्षणात पुणे-नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशा बस फेऱ्या, ठिकठिकाणी उड्डाण पूल किंवा ग्रेडसेपरेटर, भुयारी मार्ग रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना करण्याचे निश्चित केले होते.
‘नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखड्या’नुसार गोल्फ चौक येथे उड्डाणपुलाचे काम गेल्याच वर्षी पूर्ण झाले आहे. आता या पुलाखालून अर्थात लूप रस्त्यावर ग्रेडसेपरेटर करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून थेट आळंदी रस्त्यापर्यंत उड्डाणपूल किंवा ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क उड्डाणपुलाचे विस्तारीकरण सुरू आहे. येरवडा शास्त्रीनगर येथे उड्डाण पुलासाठी तर विश्रांतवाडी येथे केंद्र सरकार व पालिकेतर्फे राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेच्या २०२४-२०२५ च्या अर्थसंकल्पात १० ते १५ वर्षांपुढील पुलाच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या पुलांची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने होणार आहे. सुरुवातीला पालिकेसमोरील जयंतराव टिळक पूल, औंध येथील राजीव गांधी पूल, झेड ब्रीज आदी पुलांचा समावेश आहे.
- श्रीनिवास बोनाला, प्रकल्प संचालक, पुणे महापालिका
शिवाजी पूल नोव्हेंबर १९२३ मध्ये बांधण्यात आला आहे. याचे बांधकाम काळे कॉन्ट्रक्टरने केल्याचे नमूद आहे. त्यांचे वंशज अजूनही बांधकाम व्यवसायात आहेत. यासह डेंगळे पुलाखालीही एक लहान पूल आहे. तो पूल पेठांना जोडणारा होता. लकडी पूल (संभाजी पूल) , खडकी-येरवड्याला जोडणारा होळकर या सर्व पुलांना शंभरा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. किरकोळ दुरुस्ती सोडली तर हे पूल आजही मजबूत आहेत.
- समीर निकम, इतिहासाचे अभ्यासक