संग्रहित छायाचित्र
शहर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी पुणे महापालिकेने नियोजन केले असून याअंतर्गत एकाच वेळी सुमारे दीड हजार कर्मचारी एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उतरवून साफसफाई केली जाणार आहे.
स्वच्छ शहर पुणे शहर असे म्हणून शहर स्वच्छ राहत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची उदासिनता आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे शहरात रस्ते, मोकळ्या जागा, दुभाजक, पादचारी मार्ग यासह अन्य ठिकाणी कचरा पडलेला स्वच्छ करण्यास मर्यादा येत आहेत. परंतु आता काही केल्या शहर स्वच्छ ठेवण्याचा विडा पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी उचलला आहे. परिमंडळ एकमध्ये ९ ते १४ डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबविली जाईल. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातून सोमवारपासून (दि. ९) ही मोहीम सुरु होईल, असे प्रशासनाने सांगितले.
शहरात अनेक ठिकाणी कचरा पडला असून तो उचलण्यासाठी यंत्रणा काम करत आहे. परंतु अनेक तक्रारी आल्यानंतर शहर स्वच्छतेच्या संदर्भात शुक्रवारी (दि. ६) पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठक घेतली. त्यामध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, आकाशचिन्ह विभाग, घनकचरा विभाग, विद्युत, उद्यान, पथ, मलनिःसारण यासह अन्य विभागाचे अधिकारी, मोहल्ला कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
शहरात सध्या ठिकठिकाणी कचरा पडला आहे, दुभाजक अस्वच्छ झाले आहेत, त्यातील झाडी वेडीवाकडी वाढली आहेत. रस्ते व्यवस्थित झाडले जात नसल्याने धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच अतिक्रमणामुळे रस्त्यावर कचरा, खरकटे अन्न टाकण्याचे प्रकार वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण दैनंदिन स्वच्छता योग्य पद्धतीने केली जात नसल्याने तसेच बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली जात नसल्याने शहराचे बकालीकरण वाढले आहे.
ही स्थिती सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वंकष स्वच्छता (डीप क्लिनिंग) करण्याचे निर्णय घेतला आहे. यामध्ये महापालिकेचे सर्व विभाग, त्यातील कर्मचारी एकत्र येऊन दोन दिवसात एक क्षेत्रीय कार्यालय स्वच्छ करणार आहेत. प्रत्येक विभाग अतिरिक्त मनुष्यबळासह काम करणार असल्याने स्वच्छता केली जाईल. अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाणार आहे.
अशी होणार स्वच्छता मोहीम
- झोपडपट्टी, लगतचे रस्ते स्वच्छ करणे, रस्त्यावरील माती उचलणे
- भित्तिपत्रक, दुभाजकातील वाढलेले गवत, जाहिराती, काढणे
- रस्त्यावर बंद पडलेली व बेवारस वाहने उचलणे
- डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करणे
- रस्त्यावरील खड्डे बुजविणे, राडारोडा उचलणे
- पावसाळी गटार व सांडपाण्याचे चेंबर दुरुस्त करणे
- या मोहिमेत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांना सहभागी करून घेणे
- प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवस स्वच्छता मोहीम
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.