The 'loot' path : ‘लूट’पाथ

प्रादेशिक परिवहन कार्यालय ते एसएसपीएमएस महाविद्यालयादरम्यान मेट्रोने प्रस्तावित मेट्रो स्थानकांच्या खाली प्रमाणापेक्षा जास्त रुंद 'स्मार्ट' पदपथ नुकतेच बनवले होते. त्यामुळे येथील रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली होती. नागरिकांकडून पालिकेसह मेट्रोच्या उफराट्या निर्णयावर टीका केली जात होती. प्रशासनाला आता अचानक चूक लक्षात आल्याने पदपथ कापून पुन्हा बनवले जात आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Mahendra Kolhe
  • Mon, 22 May 2023
  • 10:13 am
‘लूट’पाथ

‘लूट’पाथ

आधी पालिकेने बांधला, मेट्रोने तोडला, मेट्रोने नंतर 'स्मार्ट'बांधला, पुन्हा मेट्रोनेच तोडला, राडारोडा कुठेही फेकला... आता सगळेच फूटपाथ ठरताहेत...

महेंद्र कोल्हे, नितीन गांगर्डे

feedback@civicmirror.in

nitin.gangarde@civicmirror.in

TWEET@mahendrakmirror

प्रादेशिक परिवहन कार्यालय ते एसएसपीएमएस महाविद्यालयादरम्यान  मेट्रोने प्रस्तावित मेट्रो स्थानकांच्या खाली प्रमाणापेक्षा जास्त रुंद 'स्मार्ट' पदपथ नुकतेच बनवले होते. त्यामुळे येथील रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली होती. नागरिकांकडून पालिकेसह मेट्रोच्या उफराट्या निर्णयावर टीका केली जात होती. प्रशासनाला आता अचानक चूक लक्षात आल्याने पदपथ  कापून पुन्हा बनवले जात आहेत. 

लोकांचा वाढता रोष लक्षात घेऊन महानगरपालिकेने मेट्रोला येथील पदपथाची रुंदी कमी करण्यास नुकतेच आदेश दिले होते. जेमतेम महिनाभरापूर्वी बनवलेले पदपथ कापून आता अरुंद करण्याचे काम मेट्रो करत आहे. मेट्रोने मात्र कहर करत शॉर्टकट शोधत या  कामाचा राडारोडा रेल्वेच्या हद्दीत कुंपणावरून पलीकडे टाकण्यास सुरुवात केली आहे. नियोजनशून्य आणि अविचाराने केलेल्या कामाचा निर्णय काही दिवसातच 

बदलण्याची पुन्हा एकदा नामुष्की मेट्रो प्रशासनावर आली आहे.    

आरटीओ कार्यालय तसेच रुबी हॉलजवळ मेट्रो स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्थानकांखाली पादचाऱ्यांसाठी पदपथ बनविण्यात आले होते. ते बनवताना त्यांची रुंदी खूपच मोठी केली होती. त्यामुळे पदपथांनी जवळपास अर्धा रस्ता व्यापून टाकला होता. या ठिकाणी रस्ता खूपच अरुंद झाला असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी दररोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक 

कोंडी होत असलेली पाहावयास मिळत होती. रस्त्याच्या मधोमध मेट्रोचे खांब उभारण्यात आले आहेत, 

दुसऱ्या बाजूला रस्त्याचा भाग कमी करून त्यावर पदपथ बांधण्यात आले आहेत. मात्र त्यांची रुंदी मोठी असल्याने ते वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याने नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिवाय पादचारी मार्ग चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला होता. तो अचानक रस्त्यावर आडवा येत असल्याने येथे अपघातही होत असल्याचे नागरिक सांगत होते. या रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होत होती.

अगोदरच घाईघाईत निर्णय न घेता विचारपूर्वक नियोजन करून काम केले असते तर जनतेचा पैसे असा वायफट खर्च झाला नसता, अशी भावना आता नागरिक व्यक्त करीत आहेत. या परिसरात रुबी हॉल, जहांगीर रुग्णालय, ससून रुग्णालय ही मोठी रुग्णालये आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून रुग्णवाहिकांची सततची ये-जा असते. अरुंद रस्ता असल्याने नेहमीच  सकाळ-सायंकाळी येथे दररोजच वाहतूक कोंडी होत असल्याने यामध्ये रुग्णवाहिकाही अडकत होत्या. वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने कोंडीतून मार्ग काढण्यात वेळ जात होता. मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी हा रस्ता वाहनांसाठी मोठा होता. आरटीओ कार्यालयासमोर वाहनांसाठीची जागाच कमी केली असल्याने होणारी वाहतूक कोंडी त्रासदायक ठरत असल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

सध्या पुणे मेट्रोची कामे शहराच्या विविध भागात सुरू असून अनेक ठिकाणची कामे पूर्णत्वास येऊ लागली आहेत. ज्या ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे तेथे खराब झालेले रस्ते, पदपथ यांची कामे महामेट्रो करत आहे. याबाबत महानगरपालिकेने याच अटीवर मेट्रोला परवानगी दिली होती. त्यानुसार मेट्रोकडून प्रशस्त पदपथ बांधले जात आहेत. अनेक ठिकाणी असलेल्या मेट्रोमार्गावर ही कामे वेगात सुरू आहेत, तर काही ठिकाणी ती पूर्णही झाली आहेत. मात्र हे पदपथ चुकीच्या पद्धतीने बनवले गेले असल्याने त्यांचा वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे. ही गोष्ट लक्षात आल्याने एसएसपीएमएस महाविद्यालय ते प्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी असलेला रस्ता महानगरपालिकेने पुणे महामेट्रोला खूपच रुंद झाल्याचे सांगत त्यात सुधारणा करायला सांगितली. त्यावर मेट्रोने येथील पदपथ खोदून त्याची रुंदी कमी करण्याचे काम सुरू केले असल्याचे महामेट्रोचे महाव्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.  

"नागरिकांच्या करातून मिळालेला पैसा प्रशासनाकडून अशाप्रकारे वाया घालविला जात आहे. आधीच शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात अशी अशास्त्रीय कामे काहीच उपयोगाची नाहीत. मात्र प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे एकच काम पुन्हा पुन्हा करावे लागत असल्याचे स्थानिक रहिवासी मनोहर सोनवणे यांनी सांगितले. "पदपथाची रचना सरळ असायला हवी. मात्र या ठिकाणी ते आतल्या बाजूला वळविले होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेने वाहने चालवत असताना अचानक मध्ये आडवे पदपथ येत होते. त्यामुळे येथे अपघातही होत होते," असेही ते म्हणाले.

सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर म्हणाले,  "पालिकेने पदपथांसाठी तयार केलेली नियमावली भारतीय रस्ते काँग्रेसच्या निकषानुसार पदपथाची मान्यताप्राप्त कमाल रुंदी ही पाच फुटाची आहे.  मात्र पदपथांची यापेक्षा अधिक रुंदी वाढवायची असेल तर तेथील रस्त्यावर एका तासात येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या विचारात घेणे गरजेचे असते. परंतु प्रशासन या निकषांकडे दुर्लक्ष करून पादचारी, नागरिकांच्या त्रासात भरच घालत आहे."

"या अडचणीच्या असलेल्या मोठ्या पदपथामुळे दुचाकीस्वार त्यावरूनच दुचाकी चालवत असल्याचे चित्र होते. चुकीच्या नियोजनामुळे त्याचा असा गैरवापर केला जात होता. आता हाच पदपथ उखडून त्याचा राडारोडा रेल्वेच्या कुंपणावरून टाकला जात आहे," असेही ते म्हणाले. 

महामेट्रोचे महाव्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. हेमंत सोनवणे यांना सीविक मिररने संपर्क केला असता ते म्हणाले, "या भागात पदपथ जास्त मोठा झाला असल्याचे महानगरपालिकेने आम्हाला सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच तो आता अरुंद करण्यात येत आहे. मात्र येथील कामाचा राडारोडा हा रेल्वेच्या परिसरात त्यांच्या परवानगीनेच टाकला जात आहे. येथील पूर्ण काम झाल्यावर तो पुन्हा उचलला जाईल."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest