भुरळ ‘एआय सौंदर्या’ची...; कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने नैसर्गिक सौंदर्यात बदल करण्याचा जीवघेणा ट्रेंड

'सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते' अशी म्हण परिचित आहे. परंतु आता या म्हणीला काही अर्थ उरला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जन्मजातच प्रत्येकाला नैसर्गिक सौंदर्य सृष्टीने बहाल केलेले असते.

AI Soundarya

भुरळ ‘एआय सौंदर्या’ची...; कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने नैसर्गिक सौंदर्यात बदल करण्याचा जीवघेणा ट्रेंड

कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये गर्दी, सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी स्त्रियांसह पुरुषही मोजताहेत लाखो रुपये

'सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते' अशी म्हण परिचित आहे. परंतु आता या म्हणीला काही अर्थ उरला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जन्मजातच प्रत्येकाला नैसर्गिक सौंदर्य सृष्टीने बहाल केलेले असते. हे सौंदर्य प्रत्येकजण मिरवत असतो. परंतु आता एआयच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) मदतीने तयार केलेल्या सौंदर्याची भूरळ पडून लाखो स्त्रियांसह पुरुषही आपल्या नैसर्गिक सौंदर्यात बदल करण्याचा जीवघेणा ट्रेंड फोफावत असल्याचे कॉस्मेटिक क्लिनिककडे वाढलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे. फिल्टर आणि एआय-निर्मित ही खरी सौंदर्याची व्याख्या ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 या तंत्रज्ञानामुळे आपल्यातील नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक मिरवण्यापेक्षा असलेल्या व्यंगावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. शरीरातील व्यंगाचा बाऊ केला जात असून काहीतरी कमतरता असल्याची मनात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे किशोरवयीनांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी लाखो रुपये मोजत असल्याचे दिसून येत आहे. शरीरावरील व्यंग दूर करण्यासाठी कॉस्मेटिक क्लिनिककडे अनेकजण धाव घेत असून डॉक्टरांकडे एआयनिर्मित, बदललेल्या प्रतिमेसारखे दिसण्याची मागणी केली जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.

एआयनिर्मित प्रतिमांप्रमाणे दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करणाऱ्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यापूर्वी एक विशिष्ट वर्ग यासाठी पुढे येत होता. पण आता चेहऱ्यावर कोणतेही व्यंग अथवा कोणताही दोष नसतानादेखील डिजिटल प्रतिमेप्रमाणे चेहऱ्यात बदल करण्याचा आग्रह धरू लागले आहेत, असे देशातील प्लॅस्टिक सर्जन्सकडून सांगितले जात आहे.

इंडियन असोसिएशन ऑफ एस्थेटिक्स प्लास्टिक सर्जनचे सचिव डॉ. रजत गुप्ता म्हणाले, ‘‘आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तिसऱ्या रुग्णाकडे फिल्टर वापलेले फोटो किंवा एआयनिर्मित पोर्ट्रेट असते. त्याप्रमाणे दिसण्याचा संबंधित व्यक्तीकडून आम्हाला आग्रह केला जातो. परंतु आजकाल लोकांना वास्तव आणि काल्पनिक यातील फरक समजत नाही. ते फक्त दिखाऊ सौंदर्याचा पाठपुरावा करत आहेत.’’

यासंदर्भात डॉ. गुप्ता यांनी एका सॉफ्टवेअर व्यावसायिक महिलेचे उदाहरण दिले. ‘‘या महिलेच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता. चेहरा अगदी देखणा होता. तरीसुद्धा एआय फिल्टर प्रतिमेमध्ये ज्याप्रमाणे नाक दिसत आहे, त्याप्रमाणे नाक दिसायला हवे असा हट्ट तिने धरला होता. डॉक्टरांनी तिच्या नैसर्गिक नाकाला योग्य म्हटले होते. तरी ती तिच्या डिजिटल प्रतिमेप्रमाणे नाकाचा आकार करण्यावर ठाम राहिली,’’ असे त्यांनी सांगितले.

एआयनिर्मित पोर्ट्रेटप्रमाणे 

चेहऱ्याच्या ट्रेंडमध्ये २५ टक्के वाढ

एआयनिर्मित पोर्ट्रेटप्रमाणे चेहऱ्यात बदल करण्याच्या या ट्रेंडमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. परंतु याप्रमाणे नैसर्गिक सौंदर्याच्या विरोधात जाऊन सर्जरी करणाऱ्यांमध्ये दुष्परिणाम दिसून येत असून तशा रुग्णांची संख्याही वाढत आहे, असे जहांगिर रुग्णालयाचे प्लास्टिक सर्जन आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुमित सक्सेना यांचे म्हणणे आहे. “पूर्वी बहुतेक महिला येत असत, पण आता पुरुषही येत आहेत. ३० ते ४५ या वयोगटातील व्यक्ती एआय प्रतिमांसोबत येतात आणि त्यांच्या कल्पित रूपाशी साम्य साधण्यासाठी शस्त्रक्रियेची मागणी करतात,” अशी माहिती त्यांनी दिली.

मुख्यतः नाक बदलणे, डोळ्यांचा आकार बदलणे आणि कान सुधारण्याच्या शस्त्रक्रियांची मागणी केली जाते. तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन अशा व्यक्ती निसर्गाशी खेळत आहेत. फिल्टर प्रतिमा घेऊन त्याप्रमाणे दिसण्याचा आग्रह हा आरोग्यावर परिणाम करतो. प्रतिमेप्रमाणे सर्जरी करणे अनेकदा अशक्य असते. तरीसुद्धा या व्यक्तींकडून आग्रह धरला जातो, असेही सक्सेना यांनी सांगितले.

नैसर्गिक सौंदर्य स्वीकारण्याची गरज

फिल्टर प्रतिमांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. एआय टूल्सद्वारे तत्काळ बदललेला लूक पाहून लोक आपल्याला कमी समजू लागतात. त्यामुळे अनेकांना निराशा किंवा नैराश्य येत आहे. व्यक्ती स्वतःला अनोखे आणि सुंदर मानण्याऐवजी आपल्यात काय कमी आहे, यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे आम्ही अनेकदा त्यांना शस्त्रक्रियेऐवजी समुपदेशनाचा सल्ला देतो, कारण खरी समस्या ही मानसिक आहे, शारीरिक नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया प्रत्येक असुरक्षिततेचे उत्तर नाही. त्यामुळे प्रत्येकाने नैसर्गिक सौंदर्य स्वीकारावे. फिल्टर किंवा एआय अॅप्सद्वारे तयार झालेल्या प्रतिमांना बळी पडू नका, अशा मोहजाळापासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.  

समाजमाध्यमांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती कॉस्मेटिक क्लिनिककडे धाव घेत असून आपल्यातील दोष शोधून फिल्टर प्रतिमेप्रमाणे करण्याची मागणी करतात. परंतु अशा अनेक व्यक्तींची समजूत काढून नैसर्गिक सौंदर्यात बदल केला तर त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. नैसर्गिक सौंदर्य ही मिळालेली देणगी असते. त्याचा स्वीकार करून कोणत्याही डिजिटल आणि फिल्टर प्रतिमेच्या मागे न लागता, यापासून स्वतःला रोखण्याची गरज आहे.

- डॉ. आशिष डवलभक्त, 

संचालक मंडळ सदस्य, इंडियन असोसिएशन ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जन

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest