पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे झालेल्या १७७ जणांचे घेतले पालकत्व
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे होऊनही त्यांच्या कुटुंबांनी नाकारलेल्या १७७ जणांचे पालकत्व पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वीकारले आहे.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात (Regional Mental Hospital Yerwada) साडेतीनशेपेक्षा अधिक बरे झालेले रुग्ण आहेत. यातील काही बेघर तर काहींना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नसल्यामुळे त्यांचा मुक्काम मनोरुग्णालयातच आहे. मानसिक आरोग्य कायदा ( मेंटल हेल्थ ॲक्ट) अंतर्गत रुग्णांचे पुनर्वसन बंधनकारक आहे. शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मदतीने १७७ बरे झालेल्या मनोरुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे, तर २३ रुग्णांना घरी पाठविले आहे.
रुग्णालयातील समाजसेवक, कर्मचाऱ्यांनी २०१ रुग्णांचे गेल्या सहा महिन्यात पुनर्वसन केल्याची माहिती, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांनी ‘सीविक मिरर’ला दिली. बरे झालेले रुग्ण आपले उर्वरित आयुष्य समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबर जगणार असल्याचे आशादायी चित्र विविध स्वयंसेवी संस्थांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे निर्माण झाले आहे.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र बेघर असलेले तसेच नातेवाईक त्यांना घरी घेऊन जात नसल्यामुळे मुक्काम मनोरुग्णालयातच असलेल्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. रुग्णालयातील कर्मचारी रुग्णाला घेऊन घरी गेल्यास नातेवाईक स्वीकारत नाहीत. अनेकांनी घर बदलले आहे. रुग्णाच्या नावे जमीन, फ्लॅट, शेती आहे. मात्र, त्याचा उपयोग रुग्णाला होत नाही. यासह नातेवाईक त्यांना स्वीकारतच नाही.
याबाबत कायदेशीर मदत घेण्यासाठी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाने सिम्बायोसिस लॉ कॉलेजसोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत सिम्बायोसिस लॉ कॉलेज रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी समन्स देणे, रुग्णाला घरी जाण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविणे, रुग्णाला घरी स्वीकारण्यासाठी नातेवाईकांना कायद्याने भाग पाडणे, रुग्णांच्या नावावर असलेली शेती, घर, फ्लॅट ( प्रॉपर्टी) संरक्षित करणे, रुग्ण व नातेवाईक यांच्यामध्ये मानसिक आरोग्य कायद्याबाबत जनजागृती करणे आदी कायदेशीर कामे मोफत करीत आहे. यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणसुद्धा मदतीला आहे. त्यामुळे रुग्णांचे पुनर्वसन मोठ्या प्रमाणात होत आहे.
शहरातील चैतन्य फाउंडेशन आणि जागृती संस्थेने प्रत्येकी ५० बरे झालेल्या रुग्णांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. किनारा संस्थेने ६५, मनोभ्रम (संवाद) संस्थेने १२ तर श्रद्धा संस्थेने ३ बरे झालेल्या मनोरुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे.
पालकत्व घेणाऱ्या संस्थांची वारंवार होणार पाहणी
केंद्र तसेच राज्य सरकारकडून बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतलेल्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे येथे रुग्णांना केवळ चहा, न्याहारी व जेवण न देता इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. यासह त्यांना विविध व्यवसायाभिमुख कौशल्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थांची वारंवार पाहणी करून त्यांना सूचना देणे आवश्यक असल्याचे मत काही संस्थांचे आहे.
मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांना दैनंदिन कामे करण्यास अडचण
येरवडा मनोरुग्णालयात गेली अनेक वर्षे उपचार घेणाऱ्या रुग्णांना दैनंदिन कामे करण्यास अडचण येते. चहा बनविणे, भाज्या निवडणे, घरातील दैनंदिन कामे करण्याचे ते विसरले असतात. बसमध्ये प्रवास करणे, तिकीट काढणे, बाजारहाट करणे अशा गोष्टी त्यांना अनोळखी असतात. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन संस्थांमध्ये झाल्यामुळे ते दैनंदिन कामांसह इतर अनेक गोष्टी शिकू शकतात. हे खऱ्या अर्थाने रुग्णांचे पुनर्वसन असल्याचे रुग्णसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांनी सांगितले.
गेल्या सहा महिन्यांत विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १७७ रुग्णांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तर बरे झालेल्या २३ रुग्णांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले आहे. यासह आणखी मनोरुग्णांचे पुनर्वसन टप्प्याटप्प्याने केले जात आहे.
- डॉ. सुनील पाटील, अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय
मनोरुग्णालयातील आंतररुग्ण विभागातील रुग्णांना मनोरुग्ण तज्ज्ञांकडून तपासून घरी पाठविण्याकरिता ठेवले जाते. मात्र, रुग्णांचे नातेवाईक रुग्णाला वर्षानुवर्षे घरी घेऊन जात नाहीत. त्यामुळे रुग्णालयातील लीगल सेलच्या माध्यमातून रुग्णाला घरी पाठविण्यासाठी सरकारी वकिलाची मदत होऊ शकते.
- भाऊसाहेब माने, समाजसेवा अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय