संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ९३ रजा मुदत शिक्षकांना वाढीव वेतनश्रेणीसह सेवेत कायम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे या शिक्षकांचा दिवाळीचा आनंद यंदा द्विगुणित झाला आहे.
पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील मानधन तत्वावरील ९३ रजा मुदत शिक्षकांना वेतनश्रेणी सह सेवेत कायम करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये दिला होता. या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ९३ रजा मुदत शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली होती. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत, सर्व शिक्षकांना न्याय देण्याचे आश्वास्त केले होते.
यानंतर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा करुन वेतनश्रेणी लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापालिकेने नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध करुन सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना सहा हजारावरुन १६ हजार वेतनश्रेणी दिली होती. तसेच, वित्त विभागाला ही अंमलबजावणीचे आदेश दिले होते. या सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता सराफ, नगरविकास विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा झाली होती. नगरविकास विभागाने सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी सहमती दर्शवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठीच्या प्रस्तावावर बुधवारी स्वाक्षरी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.