Pune News: 'एसटी' आरक्षण अंमलबजावणीच्या 'जीआर'साठी सकल धनगर समाजातर्फे 'ढोल वादन आंदोलन'

पुणे: धनगर समाजाच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण तातडीने लागू करण्याचा शासन निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे रविवारी पुण्यात ढोल वादन आंदोलन करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 13 Oct 2024
  • 03:06 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

Pune News: 'एसटी' आरक्षण अंमलबजावणीच्या 'जीआर'साठी सकल धनगर समाजातर्फे 'ढोल वादन आंदोलन'

तर धनगर समाज महायुती सरकारचे दहन करणार : अ‍ॅड. विजय गोफणे

पुणे: धनगर समाजाच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण तातडीने लागू करण्याचा शासन निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे रविवारी पुण्यात ढोल वादन आंदोलन करण्यात आले. सारसबागजवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याला अभिवादन करून धनगर समाजबांधवांनी एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा निर्णय घेतला नाही, तर उग्र स्वभावाचा धनगर समाज महायुती सरकारचे दहन केल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशारा समन्वयक अ‍ॅड. विजय गोफणे यांनी दिला.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील शेकडो धनगर बांधव, भगिनी यामध्ये सहभागी झाले होते. अ‍ॅड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते, अनिकेत कवाने, डी. बी. नाईक, मधुसूदन बरकडे, योगेश खरात, महादेव वाघमोडे, विष्णुदास गावडे, सुनंदा गडदे, पिंटू कोकरे, भरत गुरव, डॉ. सुधाकर न्हाळदे, खंडू तांबडे यासह अन्य धनगर बांधव उपस्थित होते.

अ‍ॅड. विजय गोफणे म्हणाले, "राज्यघटनेने धनगरांना एसटी प्रवर्गात आरक्षण दिलेले आहे. मात्र, राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आजवर अनेकदा धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला जगणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीचे यासंदर्भातील शासन निर्णय काढून मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द खरा करावा. तसे झाले, तर येत्या निवडणुकीत राज्यातील दोन कोटी धनगर समाज त्यांच्या पाठीशी राहील."

"आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुती सरकारने हा निर्णय घेतला नाही, तर विधानसभा निवडणुकीत धनगर समाज आपली ताकद दाखवून देईल. राज्यातील ८० ते ९० मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक भूमिका राहणार आहे. तर ७० ते ८० मतदारसंघात ५० ते ६० हजारांचे मतदान धनगर समाजाचे आहे. त्यामुळे महायुती सरकारने धनगर समाजाचा पाठिंबा मिळवायचा, की समाजाचा रोष ओढवून घ्यायचा, हे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळाने ठरवावे," असे गोफणे म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest