हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात आढळला मृतदेह
पुणे : हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात एका मोटारीमध्ये ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेल्या एका मोटारीमध्ये बाहेरून माणूस येतो आणि नंतर त्याचा मृतदेह आढळून येतो. ही घटनाच आश्चर्यात टाकणारी आहे. या घटनेमुळे हडपसर पोलिसांच्या 'जागरुकते'वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सतीश कांबळे (वय ३५, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हा कामधंदा करीत नव्हता. तो पत्नी व मुलांसह राहण्यास होता. हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात एक अपघातग्रस्त मोटार जप्त करून ठेवण्यात आलेली आहे. या मोटारीचे दरवाजे लॉक होत नाहीत. बऱ्याच दिवसांपासून ही मोटार पोलीस ठाण्याच्या आवारात आहे. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला या मोटारीमध्ये कोणीतरी झोपल्याचे दिसले. त्यांनी ड्युटीवरील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे यांनी कर्मचाऱ्यांसह जाऊन पाहणी केली. याबाबत खळदे यांनी सांगितले की, आम्ही कांबळे याला मोटारीबाहेर काढून त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्याच्या खिशामध्ये तपासणी केली असता त्याचे नाव समजले. त्याच्या नातेवाईकांचे नाव शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्याची पत्नी, मुले आणि कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.