काँक्रीटीकरण केलेला रस्ता फोडला, महापालिकेकडून सामान्यांच्या पैशाचा चुराडा
जनतेच्या पैशांचा महापालिकेने केलेल्या उधळपट्टीचा प्रकार समोर आला आहे. हॉट मिक्स प्लॅंटच्या उभारणीनंतर तीस वर्षांनी पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम अधिकाऱ्यांना आठवले. ते देखील परिसरात ५० लाख रुपये खर्च करून काँक्रीटीकरण केल्यावर. त्यामुळे वाहिनी टाकण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून हे काँक्रीटीकरण फोडण्यात आले आहे.
हॉट मिक्स प्लँटच्या उभारणीनंतर तीस वर्षांनी येथे पावसाळी वाहिनी टाकावी असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटले. येथील परिसराचे क्रॅाक्रीटीकरण झाल्यानंतर वाहिनी टाकण्याचे नियोजन झाले. त्यामुळे पंधरा लाख रूपये खर्च करून काँक्रीट फोडून ६०० मिली मीटर व्यासाची पावसाळी वाहिनी टाकण्यात आली. एवढ्या मोठ्या वाहिनीची गरज होती का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे महापालिकेच्या नगर नियोजनाचा अजब कारभार समोर आला आहे.
ज्या भागात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात वाहते त्या ठिकाणी महापालिका ६०० मिली मिटर व्यासाची पावसाळी वाहिनी टाकली जाते. मात्र हॉट मिक्स प्लॅंटच्या प्रयोगशाळेसाठी ६०० मिली मिटर व्यासाची पावसाळी वाहिनी टाकली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अद्याप सांडपाणी वाहिनी टाकलेली नाही. सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने अधिका-यांनी पावसाळी वाहिनीच्या वर सांडपाणी वाहिनी टाकण्याचा सल्ला ठेकेदाराला दिला. ठेकेदाराने ही बाब संयुक्तिक नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान ५० लाख रूपये खर्च करून संपूर्ण हॉट मिक्स प्लांट परिसराचे काँक्रिटीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. त्यानंतर पावसाळी वाहिनी टाकली जात आहे.
हॉट मिक्स प्लॅंटच्या चिमणीची उंची २५ वर्षानंतर वाढवली
शहरातील रस्ते तयार करण्यासाठी येरवड्यात तीस वर्षांपूर्वी हॉट मिक्स प्लॅंट उभारला. या प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या धुराच्या चिमणीची उंची कमी ठेवली होती. त्यामुळे तब्बल पंचवीस वर्ष महापालिका येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळली. अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार जडले. त्वचेचे आजार बळावले. अनेक तक्रारी केल्यानंतर हरित लवाद प्राधिकरणाने महापालिकेला फटकारल्यानंतर चिमणीची उंची वाढवली.
येरवडा हॉट मिक्स प्लॅंटच्या प्रयोगशाळेसाठी ६०० मिली मिटर पावसाळी वाहिनीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही वाहिनी टाकण्यात आली आहे.
- सपना सहारे, कनिष्ठ अभियंता, येरवडा हॉट मिक्स प्लॅंट