लग्नासाठी कंपनी मालकाकडे मागितली ५० लाखांची खंडणी
नितीन गांगर्डे
लग्न करण्यासाठी पैशांची गरज भागविण्यासाठी आणि लवकर भरपूर पैसे कमावण्यासाठी तसेच मौजमजा करण्यासाठी कंपनीतील कामगारांनी रात्रीच्या वेळी मालकाची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत धमकावले. त्याच्याकडून ५० लाख रुपयांची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
कात्रज महामार्गावर आर्यन स्कूल परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी नऱ्हे येथील उद्योजक अभिजीत भोळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. आरोपींवर भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा छडा लावत त्यांना अटक केली आहे.
भोळे यांची महावितरणसाठी ट्रान्सफॉर्मर बनविण्याची कंपनी आहे. ६ मे रोजी रात्री कंपनीतून घरी जात असताना कात्रज येथील महामार्गावर आर्यन स्कूलजवळ पाच-सहा जणांनी त्यांची चारचाकी गाडी अडवली. त्यांना गाडीतून खाली घेऊन एकाने चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली, तर बाकीच्यांनी मारहाण करत त्यांच्याकडे ५० लाख रुपयाची खंडणी मागितली. नंतर १२ मे रोजी दुपारी यातील एकाने भोळे यांना वॉट्सॲपवरून फोन करत पुन्हा ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. ‘‘खंडणी दिली नाही तर तुला आणि कुटुंबीयास ठार करू,’’ अशी धमकीही दिली. ही धमकी येताच भोळे यांनी भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल करून घेताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. त्यानुसार सापळा रचून गोपनीय खबऱ्यांकडून त्यांनी आरोपींविषयी माहिती मिळवली. त्यांचा शोध घेऊन चौघांना अटक करण्यात आली आहे. सौरभ संजय बनसोडे (वय २१, रा. शिवाजी चौक रामगनर वारजे), पवन मधुकर कांबळे (वय २२, रा. तरडे वस्ती, धायरी), संकेत योगेश जाधव (वय २४, रा. आनंद सुपर मार्केटमागे, नऱ्हे), कृष्णा भीमराव भाबट (वय १९, दुर्गांकुर कॉम्प्लेक्स, धायरी) अशी आरोपींची नावे आहेत.
खंडणी मागणारे आरोपी हे भोळे यांच्या कंपनीतील कामगार आहेत. मागील एक ते दीड वर्षांपासून आरोपी संकेत योगेश जाधव भोळेंच्या कंपनीत काम करत होता, तर आरोपी सौरभ बनसोडे आणि पवन कांबळे चार-पाच दिवसांपासून भोळे यांच्या कंपनीत कामाला होते. त्यांनी फिर्यादी अभिजीत भोळे यांच्याबाबतची सर्व माहिती मिळवली होती. यातील एका आरोपीला लग्न करायचे होते त्यासाठी त्याला पैशाची आवश्यकता होती, तर दुसऱ्या आरोपीला त्याच्यावर असलेले ३० हजार रुपयांचे कर्ज चुकते करायचे होते. तिसऱ्या आरोपीला मौजेसाठी पैसे मिळवायचे होते. तर चौथा, तिघे पैसे मिळवत आहेत त्यांना मदत करावी, या हेतूने या गुन्ह्यात सहभागी झाला होता.
झटपट पैसे कमवण्यासाठी चौघांनी कट रचला. कंपनीत काम करत असलेल्या या तिघांनी कंपनीचे मालक भोळे यांच्यावर बारीक नजर ठेवली होती. त्यांच्या विषयीची सगळी माहिती मिळवली. त्यांच्याकडे किती पैसे आहेत. ते ऑफिसला कोणत्या वेळी कोणत्या गाडीतून येत आहेत. त्यांची घरी जाण्याची वेळ आणि रस्ता कोणता आहे. अशी बारीकसारीक माहिती मिळवली. त्यानंतर आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून भोळे यांची गाडी अडवली. त्यांना चाकू दाखवत धमकावले आणि ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यातील चारही आरोपीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय कुंभार, विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता यांच्यासह इतर पोलीस सहकाऱ्यांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले चारही आरोपी अविवाहित आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून ते मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. यापूर्वीची त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.