उघड्या गटाराभोवती व्यावसायिकाने केले सहा तास आंदोलन
राहुल देशमुख, अनुश्री भोवरे
शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा खरेतर संशोधनाचा विषय होऊ शकेल. याच रस्त्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य पुणेकरांच्या दृष्टीने सुस्थितीतील रस्ते हा जिव्हाळ्याचा विषय असला तरी पालिका प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहायला तयार नसते. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत पुणे महानगरपालिकेचा निष्काळजीपणाचा दृष्टिकोन आणि कंत्राटदारांकडून केली जाणारी कुचकामी डागडुजी या पार्श्वभूमीवर बुधवारी एका व्यावसायिकाने एक अनोखा मार्ग पत्करला आणि पालिकेचे लक्ष वेधून घेतले आहे.
संतोष पंडित या व्यावसायिकाने एकट्याने रस्त्यावर उतरत प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणला आहे. शंकरशेठ रस्त्यावर कुमार पॅसिफिक मॉलसमोर पावसाळी गटारावरील एक झाकण नसल्याचे पंडित यांना दिसले. संभाव्य धोका लक्षात घेत पंडित यांनी त्याच ठिकाणी तब्बल सहा तास ठाण मांडत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना या अपघातापासून वाचवले. शिवाय एक आगळावेगळा मार्ग निवडत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील बेफिकीर वृत्तीही उघड केली आहे. पंडित यांच्या या आंदोलनाला परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांनी, स्थानिकांनी तर दाद दिलीच, शिवाय सहा तासांनंतर का होईना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाग आली आणि ते घटनास्थळी दाखल झाले.
नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी बाहेर पडलेले पंडित बुधवारी सकाळी ८ वाजता शंकरशेठ रस्त्यावरून खड्डे चुकवत जात होते. त्याचवेळी कुमार पॅसिफिक मॅालसमोर त्यांना एका गटारावर झाकणच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते जवळ गेले आणि त्यांना हे गटार १५ फूट खोल असल्याचे समजले. या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वजनामुळे गटाराच्या झाकणाभोवती पालिकेने केलेली डागडुजी कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पंडित तिथेच थांबले. त्यांनी या उघड्या गटाराभोवती रंगरंगोटी केली. एखाद्याला निरोप द्यावा त्याप्रमाणे या गटाराभोवती फुलांचा हार आणून रचला आणि तिथेच ते दोन्ही हात जोडून उभे होते. या सर्व प्रकारामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना इथे काहीतरी घडत आहे, हे समजल्याने ते हा धोका टाळून पुढे सरकत होते.
पंडित यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचे कुतूहल वाढत होते. त्यामुळे एक व्यक्ती रस्त्यावरील खड्ड्याभोवती रंगरंगोटी करून वाहनचालकांना सावध करत असल्याची बातमीही सर्वत्र पसरली. त्यांचे हे आंदोलन थोडेथोडके नव्हे तर तब्बल सहा तास सुरू होते. उघड्या गटाराला पुष्पहार अर्पण करून त्यांनी जणू एकूण व्यवस्थेचेच थडगे उभारले असल्याचा संदेश वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांकरवी सर्वत्र दिला गेला. कारण सुरुवातीला एकटेच निगरगट्ट पालिकेच्या कार्यपद्धतीवर आपल्या अनोख्या आंदोलनातून टीका करणाऱ्या पंडित यांच्या सोबतीला आता स्थानिक नागरिकांनीही साथ द्यायला सुरुवात केली होती.
सहा तासांनी पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना पंडित यांच्यासोबत अनेक नागरिक उघड्या गटाराभोवती जमा झाल्यासारखे दिसले. पंडित यांचा अवतार बघत आणि स्थानिकांचे संतप्त चेहरे बघितल्यावर परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले.
चांगले रस्ते, पायाभूत सुविधांसाठी आपण पालिकेला कर देतो, त्या बदल्यात पालिका आपल्याला उघडी गटारे, खड्डयांनी चाळण झालेले रस्ते देते. आज मी एका उघड्या गटाराचे थडगे करत पालिकेच्या कार्यपद्धतीबद्दल निषेध व्यक्त केला आहे. भविष्यातही असा निष्काळजीपणा सुरू राहणार असेल तर मी पुन्हा रस्त्यावर उतरायला तयार असल्याची भावना संतोष पंडित यांनी 'सीविक मिरर'शी संवाद साधताना व्यक्त केली आहे.
पंडित यांचे हे काही पहिलेच आंदोलन नाही. यापूर्वी विविध रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत संतोष पंडित यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ८० वेळा आवाज उठवला आहे, पालिकेचे लक्ष वेधलेले आहे. पालिकेला उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंती रंगवायला वेळ आहे, मात्र ज्यामुळे रोज पुणेकरांचा जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात त्या खड्ड्यांची दुरुस्ती करायला वेळ नाही, हे समजण्यापलीकडचे असल्याचे सांगत पंडित आपला संताप व्यक्त करतात.
दरम्यान संतोष पंडित यांच्या या एकाकी पण अनोख्या आंदोलनामुळे सर्वसामान्य पुणेकरांनाही एक व्यक्ती कशा प्रकारे पालिकेच्या निगरगट्ट वृत्तीवर मात करू शकते, हे उमगले आहे.