Ganesha mandals : पालिकेच्या बैठकीकडे प्रमुख गणेश मंडळांची पाठ
गणेशोत्सवाला अवघे अकरा दिवस शिल्लक राहिल्याने त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महानगरपाालिकने शहरातील गणेश मंडळांची शुक्रवारी बैठक बोलावली होती. मात्र बैठकीला अवघ्या पाच ते सात मंडळांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावल्याने शहरातील प्रमुख मंडळांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. मंडळांना जाहिरात लावण्याची परवानगी देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
महापालिकेने गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी पालिकेच्या मुख्य इमारतीमधील जुन्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक आयोजित केली होती. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, पोलीस सहआयुक्त डॉ. संदीप कर्णिक, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, महापालिका सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप आदी उपस्थित होते. पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसह मोजक्याच गणेश मंडळांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात शहराची सुरक्षा, पार्किंगची समस्या, स्वच्छतागृहांची व्यवस्था, गणेश मंडळांची परवानगी, रस्त्यांवरील खड्डे, मिरवणुकीदरम्यान येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. गणेश मूर्तींची विक्री करण्यासाठी लवकर परवानगी मिळावी, अशी मागणी मूर्तिकार संघटनेचे ज्ञानेश्वर चांदेकर यांनी केली. सर्व विक्रेत्यांना १२ सप्टेंबरपर्यंत परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन या वेळी महापालिका आयुक्तांनी दिले.
जाहिरात शुल्क माफ करण्याची तयारी
गणेश मंडळांकडून उत्सवाचा आर्थिक खर्च भागविण्यासाठी विविध प्रायोजकांच्या जाहिराती लावल्या जातात. या जाहिरातींच्या माध्यमातूनच आर्थिक खर्च भागविला जातो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने जाहिरात लावण्याची परवानगी देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, अशी मागणी मंडळांनी केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत यावर निर्णय घेतला जाईल असे सांगून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही, असे या वेळी महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
बैठक घेण्यास पालिकेकडून दिरंगाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून गणेश मंडळांबरोबर बैठक घेतली जाते. मंडळांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाते. त्यासाठी पालिका गणेशोत्सवाच्या किमान दीड महिने आधी बैठक घेते. मात्र यंदा पालिकेने उशीर का केला, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
पालिका प्रशासनाने गणेशोत्सवासाठी कसून तयारी केली आहे. गणेशोत्सवासाठी अजून दहा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे मंडळांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे. यंदा स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदा उशीर झाला असला तरी पुढच्या वर्षी लवकर बैठक घेऊ. - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त
गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सद्यस्थितीत शहरातील किती सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत आणि अजून किती लावण्याची गरज आहे, याची माहिती घेण्यात येत आहे. या काळात समाजमाध्यमांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. - डॉ. संदीप कर्णिक, पोलीस सहआयुक्त
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.