खंडणीसाठी चहा व्यावसायिकाला बेदम मारहाण, दोघांना अटक
खंडणी उकळण्यासाठी एका चहा व्यावसायिकाला तीन जणांच्या टोळक्यांनी दुकानात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ही घटना पुण्यातील विमाननगर परिसरातील गंगापूरम सोसायटी समोर घडली.
रोहित नागेश कोळी (वय २२ वर्षे रा. संजय पार्क गल्ली नं.३ न्यु एअरपोर्ट रोड लोहगाव पुणे) आणि सोमनाथ दिपक गायकवाड (वय २१ वर्षे रा. गल्ली नं.५ संजयपार्क विमाननगर पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील गंगापुरम सोसायटी समोर “काकाचा चहा” नावाचे दुकान आहे. १८ एप्रिल रोजी काकाचा चहाचे मालक आपल्या दुकानात हजर असताना तीन टोळके अचानक दुकानात घुसले. टोळक्यांनी दुकान व्यावसायिकाला लोखंडी हत्याराचा धाक दाखवून खंडणीची मागणी केली. त्यानंतर व्यावसायिकाल बेदम मारहाण केली.
या प्रकरणाचा विमानतळ पोलिस शोध घेत असताना संबंधित आरोपी विमाननगरमधील म्हाडा कॉलनीजवळील मोकळ्या जागेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणा अधिक तपास विमानतळ पोलिस तपास करत आहेत.