‘आरोग्य बिघडल्याची’ शहरभर चर्चा
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागप्रमुख डॉ. भगवान पवार आणि यांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची अवघ्या सहा महिन्यांच्या आत बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या विषयावरून महापालिकेसह शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
डॉ. भगवान पवार आणि डॉ. रामचंद्र हंकारे या दोघांचीही मंगळवारी (दि. ५) सायंकाळी बदली करण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांची नियुक्तीच्या सहा महिन्याच्या आतच बदली झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले असून दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांची मुंबई येथे बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील डीन आशीष श्रीनाथ बनगीनवार यांना केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एमबीबीएस प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुणे महापालिकेने तीन सदस्यीय नेमली आहे. या समितीने आयुक्तांना आहवाल सादर केला आहे. त्यात डीन दोषी आढळल्याचे दिसून आले असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. असे असताना अचानक नेमके याचवेळी डॉ. भगवान पवार यांची बदली झाल्याने महापालिकेत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. डाॅ. पवार यांची आरोग्य सेवेच्या अंधत्व नियंत्रण कार्यक्रम येथे आरोग्य सहायक संचालकपदी बदली झाली आहे.
डॉ. रामचंद्र हंकारे यांनी पाच महिन्यांपूर्वी डॉ. भगवान पवार यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्याचप्रमाणे डॉ. भगवान पवार यांनीही त्याच कालावधीत महापालिका वैद्यकीय अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली होती. आता हंकारे यांची मुंबई येथे औद्योगिक आरोग्य विभागात सहायक संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. याबाबत आदेश सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी सायंकाळी काढला.
या अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे आणि संबंधित अधिकाऱ्याने त्यांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित हजर होऊन, त्याबाबतचा अहवाल आरोग्य विभाग, मुंबई यांना सादर करावा, असेही राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.