Traffic Rules : उन्हाळा..? मग नियम पाळा !

पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी पोलीस, सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबवले... मात्र या उपक्रमांकडे पुणेकरांनी फार लक्ष दिल्याचे आढळत नाही. उलट हेल्मेटचा वापर शहरात कसा अशास्त्रीय आहे, यावर तत्त्वज्ञान मांडत चळवळ उभारणारे महाभागही या पुण्याने पाहिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 20 May 2023
  • 01:42 pm
उन्हाळा..? मग नियम पाळा !

उन्हाळा..? मग नियम पाळा !

पुणेकर सध्या झेब्रा क्रॉसिंगपासून फर्लांगभर अंतरावर सावलीत थांबवताहेत वाहने

तन्मय ठोंबरे / विशाल शिर्के

feedback@civicmirror.in

पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी पोलीस, सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबवले... मात्र या  उपक्रमांकडे पुणेकरांनी फार लक्ष दिल्याचे आढळत नाही. उलट हेल्मेटचा वापर शहरात कसा अशास्त्रीय आहे, यावर तत्त्वज्ञान मांडत चळवळ उभारणारे महाभागही या पुण्याने पाहिले आहेत. मात्र, सध्या पुण्याचा पारा चाळिशी पार जात असल्याने उन्हाच्या काहिलीने पुणेकरांना ताळ्यावर आणले आहे. झेब्रॉ क्रॉसिंग आपल्यासाठी असते यावर विश्वास असणारे बहुतांश पुणेकर झाडाच्या सावलीत वाहन थांबवता यावे यासाठी सिग्नलच्या फर्लांगभर आधीच थांबताना दिसत आहेत.

एप्रिल आणि मे महिन्यात पुण्यातील तापमानाचा पारा ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या घरात राहतो. गुरुवारीही (दि. १८) शहरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या घरात होता. येत्या २४ मे पर्यंत शहरातील तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या घरात राहील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. सकाळी नऊ पासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होते. जसजसे ऊन वाढत जाईल, तसतशी अंगाची काहिली होत आहे. सायंकाळी पाच वाजता ऊन उतरणीला लागल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत झळा आणि वातावरणातील गरमीचा अनुभव पुणेकर घेत आहेत. कामानिमित्त उन्हात बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही.

शहरामध्ये रस्त्याच्या कडेला अथवा दुतर्फा दाट झाडी असणारे बोटावर मोजण्याइतकेच रस्ते आहेत. काही ठिकाणी दाट पसारा असलेली झाडे असली तरी ती सिग्नलपासून काही अंतर दूर आहेत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी या झाडांचा आश्रय घेताना वाहनचालक दिसत आहेत. शहरातील अनेक सिग्नलवर वीस सेकंदापासून ते दीड मिनिटांपर्यंत थांबावे लागते. उन्हाच्या झळांमध्ये इतका काळ थांबणे असह्य होते. 

परिणामी लाल सिग्नल पडल्यावर वाहनचालक सिग्नलजवळच्या झाडांच्या सावलीचा आसरा घेत थांबत आहेत. इतर वेळी झेब्रा क्रॉसिंग न पाळणारे वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगपूर्वी फर्लांगभर अंतरावर असणाऱ्या झाडाच्या सावलीत वाहन उभे करत आहेत. पुढील वाहनचालकाला हॉर्न वाजवून बेजार करणारे चालकही गुमान त्या व्यक्तीच्या मागे वाहन लावताना दिसतात. एक प्रकारे उन्हाच्या काहिलीने पुणेकरांना शिस्त लावल्याचे दिसून येत आहे.

झेब्रा क्रॉसिंगच्या पूर्वी वाहन लावावे, सिग्नल तोडू नये, हॉर्नचा विनाकारण वापर करू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी अनेकदा मोहीम राबवली आहे. त्यासाठी दंडात्मक कारवाई केली. अनेकांचा परवाना निलंबित केला आहे. हेल्मेट सक्तीसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली होती. मात्र, त्या विरोधात पुणेकरांनी चक्क हेल्मेट विरोधी कृती समिती स्थापन केली होती. सर्व पक्षीय या विरोधात एकत्र आले होते. अशा या पुणेकरांना सूर्याच्या तापाने वठणीवर आणल्याचे चित्र सध्या शहरात विविध सिग्नलवर दिसत आहे.  

नाना पेठेतील रहिवासी नीळकंठ मांढरे म्हणाले, मी सामान्यतः पीएमपीने प्रवास करतो. मात्र, बसमध्येही बसणे असह्य होत आहे. दुचाकीवरून प्रवास करणे आणखी असह्य होत असणार. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वाहनचालक सिग्नलपूर्वी असलेल्या झाडाचा आसरा घेताना दिसतात. त्याशिवाय त्यांना पर्यायच राहिला नाही. उलट सावलीत एकाने गाडी लावल्यास त्याच्या मागे इतर वाहन चालक गाडी लावताना दिसतात. पुढे इतकी जागा का सोडली असे सांगण्यासाठी कोणी हॉर्न वाजवत नाही. कारण उन्हाचा त्रास सर्वांनाच जाणवत आहे.

पर्यावरण तज्ज्ञ सचिन पुणेकर म्हणाले, शहरीकरणामुळे पुणे शहरातील हिरवाई बदलली आहे. अपवाद वगळता रस्त्याच्या दुतर्फा झाडी दिसून येते. दाट पसारा असलेल्या झाडांची संख्या कमी झाली आहे. सिमेंटचे रस्ते, वाहनांची वाढती संख्या यामुळे तापमानवाढीस हातभार लागला आहे. मोकळी जमीन राहिली नाही. झाडा-झुडपांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त तापमान शोषून घेणारी पर्यावरणीय व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे उन्हाचा ताप असह्य झाला आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी नैसर्गिक परिसंस्था वाढवण्यावर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर भर द्यायला हवा. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest