PMPML च्या खासगी चालकांचा अचानक संप, प्रवाशांचे हाल, प्रशासनाची त्रेधातिरपीट, नेमकं कारण काय?

पुणे शहराची लाईफ लाईन म्हणून ओळख असणाऱ्या पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी शुक्रवारी (दि २५) रोजी सकाळच्या सत्रात पीएमपीएमएल प्रशासनाला कोणतीही पुर्वकल्पना न देता संप पुकारला आहे. या संपामध्ये पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रिक बसवर कार्यरत असलेले ट्रॅव्हल टाईम कंपनीच्या तब्बल २०० बसचालकांचा समावेश आहे. अचानक पीएमपीएमएल बससेवा बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 26 Aug 2023
  • 02:24 pm
PMPML च्या खासगी  चालकांचा अचानक संप, प्रवाशांचे हाल, प्रशासनाची त्रेधातिरपीट, नेमकं कारण काय?

संग्रहित छायाचित्र

अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालकांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द

पुणे शहराची लाईफ लाईन म्हणून ओळख असणाऱ्या पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी शुक्रवारी (दि २५) रोजी सकाळच्या सत्रात पीएमपीएमएल प्रशासनाला कोणतीही पुर्वकल्पना न देता संप पुकारला आहे. या संपामध्ये पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रिक बसवर कार्यरत असलेले ट्रॅव्हल टाईम कंपनीच्या तब्बल २०० बसचालकांचा समावेश आहे. अचानक पीएमपीएमएल बससेवा बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पीएमपीएमएल बसवर अवलंबून असणाऱ्या अनेकांना कार्यालयात, कामावर जाण्यासाठी उशीर झाला असल्याचे दिसून आले. 

पीएमपीएमएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांच्या चालकांनी अचानक संपावर गेल्याने सामन्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा फटका सामान्य पुणेकरांना बसला.  महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी हे रोज या पीएमपीएमएलने प्रवास करतात. अचानक बसची संख्या कमी झाल्यामुळे अनेकांना कामावर पोहचायला उशीर झाल्याचे बघायला मिळाले आहे. 

...म्हणून कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

महागाईच्या काळात किमान 750 ते 900 रुपयांपर्यंत रोज मिळायला हवा. मात्र, ठेकेदार आम्हाला फक्त 530 रुपयेच देतात. इतक्‍या कमी पगारात आम्ही घर कसे चालवणार? त्यामुळे पीएमपी प्रशासनाने यात मध्यस्थी करून योग्य तो निर्णय घ्यावा,’ अशी मागणी चालकांकडून करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. 

अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालकांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द 

बस चालकांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे पुणेकरांची गैरसोय होणार यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालकांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासून संप पुकारल्यामुळे बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे कर्वेरस्त्यासह अन्य मार्गावर प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागले. यावेळी प्रशासनाकडून चालकांचे नियोजन करून मार्गावर बस सोडल्या. 

पीएमपीएमएलकडे सध्या 2 हजार 181 बस आहेत. त्यातील काही ठेकेदारांच्या भाडेतत्वावरील तर काही स्व:मालकीच्या आहेत. सुमारे 4 हजार चालकांमार्फत शहरात बससेवा पुरविली जाते. 2 हजार चालक पीएमपीचे स्वत:चे तर 2 हजार ठेकेदारांचे आहेत. यातीलच ट्रॅव्हल टाईम कंपनीकडील 200 चालकांनी शुक्रवारी अचानक संप केला. त्यामुळे पीएमपीच्या वाहतूकीवर सकाळी काही प्रमाणात परिणाम झाला. परिणामी, बसेसची वारंवारिता कमी झाली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest