विद्यार्थ्यांचे चोरलेले लॅपटॉप मिळवले परत, वारजे पोलिसांची कामगिरी
पुणे : विद्यार्थ्यांचे चोरलेले १५ लॅपटॉप त्यांना परत करण्यात आले. वारजे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याकडून हे सर्व लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. चोरीला गेलेले आपले लॅपटॉप परत मिळवून विद्यार्थी आनंदी झाले. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते हे लॅपटॉप विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले.
अर्जुन तुकाराम झाडे (वय २२, रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. यासोबतच प्रतीक मांडेकर आणि ऋषिकेश शिर्के (दोघेही रा. मावळेआळी, कर्वेनगर) यांचा देखील शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या महाविद्यालय परिसरातील इमारती आणि हॉस्टेलमध्ये प्रवेश करून हे चोरटे चोरी करीत होते. त्याकरिता विद्यार्थ्यांनी बुटामध्ये अथवा दरवाजाजवळ ठेवलेली चावी ते शोधत असत. लॉक उघडून रूममध्ये प्रवेश करीत असत आणि रूम मध्ये ठेवलेले लॅपटॉप सुरू नेत होते.
या चोरट्यांकडून एकूण १५ लॅपटॉप, ७ लॅपटॉप चार्जर, एक कॅमेरा, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुण्यासोबतच महाड शहर पोलीस ठाण्यात आणि माणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे देखील उघडकिस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून एकूण सहा लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.