‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाची अभिमान पदयात्रा
लोकशाही प्रक्रिया अर्थपूर्ण होण्यासाठी समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या समस्या जाणून घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणे गरजचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकांत देशपांडे यांनी केले.
पुण्यातील ‘युतक’ या संस्थेतर्फे आयोजित ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या अभिमान पदयात्रेत सहभाग घेऊन डॉ. देशपांडे यांनी उपस्थितांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्र. निवडणूक उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के आणि ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदाय तसेच युतक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. देशपांडे म्हणाले, “लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाचे सदस्य पदयात्रेत सहभागी होऊन आपल्या समस्या समाजासमोर मांडत असतांना समाजाकडूनही त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. त्यांचे शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नाकडेही समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रीयेत समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होणे गरजचे आहे.”
संभाजीराजे उद्यान – डेक्कन बस स्थानक, गूड लक चौक – एफसी गेट – शिरोळे रोड – संभाजीराजे उद्यान या मार्गावर रॅलीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मतदार नोंदणीचे देखील आवाहन करण्यात आले. रॅलीच्या निमित्ताने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या सदस्यांनी आपल्या समस्या समाजा समोर ठेवल्या.