‘द केरला स्टोरी’ च्या प्रदर्शनावेळी घोषणाबाजी
राहुल देशमुख
फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) परिसरात ‘द केरला स्टोरी’ या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने समर्थक आणि विरोधक आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
द केरला स्टोरीचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि निर्माते विपूल शाह यांच्या उपस्थितीत मायटी फिल्म सोसायटीने चित्रपटाचे प्रदर्शन एफटीआयआयच्या परिसरात आयोजित केले होते.
चित्रपटाचे प्रदर्शन संपत असताना द केरला स्टोरीच्या समर्थकांनी काही घोषणा दिल्या. याचवेळी प्रत्युत्तर म्हणून चित्रपटाच्या विरोधकांनीही घोषणा दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. एवढेच नव्हे तर बेमुदत उपोषणाला बसलेले आंदोलक विद्यार्थीही या घोषणाबाजीत सामील झाले आणि त्यांनी विरोधात घोषणा दिल्या. २०२० च्या तुकडीतील काही विद्यार्थ्यांना प्रशासनाने काढून टाकले असून त्यांनी आपले निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपायुक्त गिल यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना बाजूला केले.
चित्रपट निर्माते विपूल शाह म्हणाले की, देशातील प्रतिष्ठेच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट दाखवला गेला याचा मला अभिमान वाटतो. काही विद्यार्थ्यांना चित्रपट पाहण्यास यावयाचे होते, मात्र, त्यांना अडविण्यात आले. आम्ही निदर्शकांशी चर्चा केली आणि त्यावर तोडगा काढला. निदर्शकांनी त्यांचा लोकशाही हक्क बजावत आपली भूमिका मांडली.
दरम्यान, एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष मंकप नॉकवोहाम यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले असून ते त्यात म्हणतात की, विद्यार्थ्यांना या उपक्रमाची कल्पना दिलेली नव्हती आणि त्यात सहभागी होण्यासाठी सांगितलेले नव्हते. या चित्रपटातून एका विशिष्ट विचारसरणीचा प्रचार केला जात असून विद्यार्थी समुदायाने त्याचा निषेध करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. सरकार पुरस्कृत इस्लामोफोबियाचा एफटीआयआयमध्ये प्रचार करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा उत्सव मंत्री आणि तीनशेजणांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार होता. आम्ही चित्रपट निर्मिती आणि अभिनयाचे जेथे शिक्षण घेतले, त्यासाठी खस्ता खाल्ल्या अशी ही जागा म्हणजे इन्स्टिट्यूट आणि मुख्य थियटर म्हणता येईल. एकांगी विचारसरणीच्या चित्रपट प्रदर्शनाचा उत्सव साजरा करण्याला योग्य आहे असे आम्हाला बिल्कूल वाटत नाही. या चित्रपटाने केलेला एकांगी प्रचार आणि समाजाच्या केलेल्या नुकसानीला आळा बसेल, हे नक्की.