खराडी येथील खासगी जागेत ३८० वृक्षांची कत्तल, जागा मालकावर फौजदारी गुन्हा
येरवडा : खराडी (Kharadi) येथील सर्व्हे नंबर १४०/१/२ वरील एका खासगी कंपनीने त्यांच्या आवारातील सुकलेल्या २६ वृक्ष काढण्याची परवानगी महापालिकेच्या (PMC Pune) उद्यान विभागाकडे मागितली होती. मात्र , कंपनीने दहा पंधरा नव्हे तर तब्बल ३५० वृक्ष जेसीबीचा सहाय्याने मुळासकट काढुन टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात उद्यान विभागाने जागा मालकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक उद्यान अधिक्षक गुरूस्वामी तुमाले (Guruswami Tumale) यांनी ‘मिरर’ ला दिली.
वाघेश्वर उद्योग समूहाचे विजय गायकवाड आणि किर्लोस्कर ट्रॅान्सफॅार्मचे व्यवस्थापक करंदीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील खराडी येथे व्होल्टास कंपनी , वाघेश्वर उद्योग समूह व किर्लोस्कर ट्रान्सफॉमर्स कंपनीची जागा गेली अनेक वर्ष रिकामी होती. या जागेत वृक्षसंपदा निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात ससे, पक्ष, किटकांचा अधिवास होता. ही जागा दीर्घ काळासाठी भाडे तत्वावर द्यायचे होते. मात्र, संबंधीत कंपनीने वृक्षांची अडचण सांगितली.
जागा मालकांनी उद्यान विभागातील काही अधिकारी यांना हाताशी घेतले. या परिसरातील सुकलेले केवळ २६ वृक्ष काढण्यासाठी परवानगी मागितली. या परवानगीचा आधार घेत कपनीने चक्क ३५० वृक्षांची कत्तल केली. त्यासाठी जेसीबीच्या माध्यमातुन लहान मोठे वृक्ष भुईसपाट केले.
या बाबतची माहिती अतिशय गोपनीय ठेवली होती. मात्र, उद्यान विभागातील अधिका-यांमध्ये समन्वयाचा अभाव चव्हाट्यवर आल्याने याला वाचा फुटली. खराडी येथील जागेत ३५० वृक्ष बेकायदा व अनाधिकृत काढले आहेत. त्यांना नोटीस दिले असुन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे, असे गुरूस्वामी तुम्माले यांनी सांगितले.
उद्यान विभागाने जागेवर पंचनामा करून ३५० पेक्षा जास्त वृक्षांची कत्तल झाल्याचा अहवाल तयार करून संबंधीत जागा मालकाला नोटीस दिली असुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला. यामध्ये जागा लालकावर पाच हजार रूपये दंड व एक वर्षा पर्यंत शिक्षा होऊ शकते, असे उद्यान निरीक्षक संदिप चव्हाण यांनी सांगितले