टिळक चौकातील नियमबाह्य तीन होर्डिंग उभारणीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका
अमोल अवचिते
पुणे शहरातील टिळक चौकात संभाजी पोलीस चौकीच्या मागे नियमबाह्यपद्धतीने तीन होर्डिंगचे एकत्रीकरण करून मोठे होर्डिंग उभारले आहे. हे होर्डिंग नियमानुसार उभारले आहे का ? याची पाहणी करण्यास कुचराई केल्याचा ठपका ठेवत सहायक आयुक्तांसह परवाना निरीक्षकांवर कायद्याचा बडगा दाखवत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले आहे.
शहरात मोठ-मोठे होर्डिंग उभारले जात आहेत. त्यासाठी महापालिकेडून परवाना घेणे आवश्यक आहे. होर्डिंग उभारण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता केल्यानंतर पालिकेकडून रितसर परवाना दिला जातो. परवाना मिळवताना सर्व अटींची पूर्तता करून काम केले जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र काम करताना नियमांचे पालन होत नाही. शहरात काही ठिकाणी होर्डिंग पडल्याने मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे मोठे होर्डिंग उभारताना पालिकेकडून तपासणी करणे आवश्यक असते. टिळक चौकात संभाजी पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला तीन होर्डिंगला परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या नियमानुसार होर्डिंग उभारताना प्रत्येक होर्डिंगमध्ये कमीत कमी एक मीटरचे अंतर आवश्यक आहे. तसेच ते होर्डिंग एकमेकांशी जोडून उभारू नयेत, असा नियम आहे. मात्र टिळक चौकातील होर्डिंग उभारताना नेमके हेच नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी तीन होर्डिंग एकमेकांशी जोडून उभारले आहेत. याबाबतची तक्रार आल्यानंतर आकाशचिन्ह विभागाने या कामाचा अहवाल मागवला होता, पण हा अहवाल समाधानकारक नसल्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार, उपायुक्त माधव जगताप यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. या होर्डिंगची उभारणी करताना कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षक, सहायक आयुक्तांनी लक्ष दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे खेमनार यांनी सांगितले.
होर्डिंगधारकाचा अजब कारभार...
होर्डिंगची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गेले होते. त्यावेळी होर्डिंग उभारण्यासाठी जमीन सपाट करणे आवश्यक होते. त्यासाठी नदीपात्रात राडारोडा टाकण्यात आला होता. तो निर्दशनात येताच राडारोडा उचलण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर तोच राडारोडा उचलून पुन्हा नदी पात्रातच टाकला जात असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने पाहिले. या अजब कारभाराबद्दल आता संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पत्र दिले असल्याचे उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.