बारामती ॲग्रो कारखान्याला साडेचार लाखाचा दंड
राष्ट्रवीदीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याला साडेचार लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. भाजप नेते राम शिंदे यांच्य तक्रारीनंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे.
साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत १५ ऑक्टोंबर २०२२ ही तारीख निश्चित केली होती. मात्र, इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याने १५ ऑक्टोबर पूर्वीच गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा राम शिंदे यांनी केला होता. याप्रकरणी बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, “कारखान्यात ऊस ट्रक व टेंपोत आणला होता. तो बेकायदेशीर होता, त्याचा इलेक्ट्रॉनिक पुरावा देण्यात आला. त्यात कुठेही कारखान्याला आपले म्हणणे मांडता आले नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील बारामती ऍग्रो या साखर कारखान्याला साडेचार लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.”
“१५ ऑक्टोंबरच्या अगोदर सुमारे ९०० टन जास्तीत जास्त ऊस आणून ठेवल्याचे समोर आले. तसेच तो ५ ते ६ दिवसानंतर गाळप करण्यात आला. त्यामुळे एवढा गाळपाचा ऊस शेतकऱ्याला कल्पना न देता आणल्यामुळे या गाळपावर ५०० रुपये प्रति टननुसार या दंडाचे आदेश २३ मार्च २०२३ रोजी देण्यात आले”, असेही यावेळी बोलताना शेखर गायकवाड यांनी सांगिले.