Shivvastra : कलाकारांनी साकारले पंचधातूचे 'शिववस्त्र'
अनेक पुरातन पुस्तकात तसेच दस्तऐवजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रे पाहायला मिळतात. छत्रपतींचे नाव, त्यांचा रुबाब, त्यांचा पेहराव पाहिला की प्रत्येक शिवप्रेमीचा उर अभिमानाने भरून येतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा, ऊर्जा प्रत्येक मराठी माणसाला सतत मिळत राहावी म्हणून 'तष्ट' आणि कृष्णाई समाजसेवा संस्थेच्या वतीने पंचधातूपासून 'शिववस्त्र' साकारण्यात आले आहे.
हे 'शिववस्त्र' लवकरच सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये प्रदर्शनासाठी जाणार असल्याची माहिती 'संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. हे ऐतिहासिक शिववस्त्र साकारून 'तष्ट' परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना वाहण्यात आली आहे. शिवाजी महाराजांकडून मिळणारी ऊर्जा त्यांच्या पेहरावातूनही भविष्यात पुढच्या पिढीला मिळावी म्हणून या पेहरावाला लोकार्पण करून जतन करून ठेवण्याचा मानस 'तष्ट' चा आहे. इंग्लंडमध्ये नोव्हेंबर महिन्यात एका खास प्रदर्शनात हे 'शिववस्त्र' तेथील नागरिकांना पाहता येणार आहे, अशी माहिती तष्टचे संचालक दीपक माने व क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या विषयी माहिती देताना 'तष्ट' चे संचालक दीपक माने म्हणाले, "शिववस्त्र" हा कोणता साधारण पेहराव नाही. पुरातन पुस्तकात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच चित्रात हा पेहराव आपल्याला दिसतो. हा पोशाख प्रथम प्रत्यक्ष घडवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या पोशाखाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यामध्ये सोने, चांदी, तांबे यांसारख्या 'पंचधातूचा' वापर करण्यात आला आहे. हे पंचधातू लोकांनी स्वखुशीने तष्टकडे सुपूर्द केले. त्यानंतर मशीनवर्क आणि हँडवर्क यांचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आला. यासाठी कारागीर, एंब्रॉडरी कारागीर, टेलर आणि डिझायनर मिळून ३५ जणांच्या टीमने ६ महिन्यात हा पोशाख तयार केला आहे.
या विषयी अधिक माहिती देताना 'तष्ट' चे क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार म्हणाले, "इतिहासाची पहिल्यापासूनच मला आवड होती. त्यामुळे अशा प्रकारचे एक संग्रहालय करायचे हे माझ्या मनात आधीपासूनच होते. आम्ही कापड उद्योगात असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोणीही न पाहिलेले पोशाख आपण बनवू शकतो, हे सुचलं. त्यानंतर महाराजांचे दुर्मीळ फोटो शोधले. त्यातून महाराजांचे पोशाख निवडण्यात आले. त्यांचा इतिहासात उल्लेख शोधण्याचा प्रयत्न केला. अन् त्यानंतर महाराजांचा पोशाख बनवण्याचे ठरले. आम्ही कोठेही दावा करत नाही की हे कोणत्या घराण्याचे किंवा कोण्या एका काळातील ' शिववस्त्र' आहे. मात्र हे पाहून कोणासमोर महाराजांचे चित्र उभे राहिले तर आमच्या कामाचे सार्थक झाले असे आम्हाला वाटेल.
छत्रपतींची वेशभूषा
महाराजांच्या वेशभूषेबद्दल आपण कवी परमानंदाने लिहिले आहे त्यात एक मार्मिक नोंद केली आहे. अफझलखानाच्या भेटीला जातानाचे महाराजांचे वर्णन करताना तो लिहितो की , “ महाराजांची दाढी कात्रीने नीटनेटकी केलेली होती. ' ही गोष्ट तशी अगदी किरकोळ आहे, पण त्यातून त्यांचा ‘एस्थेटिक सेन्स’ दिसून येतो”.
महाराजांची जुनी चित्रे उपलब्ध आहेत. त्यात ब्रिटिश म्युझियम लायब्ररी, लंडन येथील चित्रांतील पोशाख, तसेच कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमधील म्युझियममध्ये आणि हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये महाराजांचे एकेक चित्र आहे. ही दोन्ही चित्रे समोरून ठेवून ही वस्त्रे तयार केली असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.