पुण्याला जोडणारा शिरूर ते कर्जत नवा महामार्ग होणार !
पुण्याला जोडणारा शिरूर ते कर्जतला असा नवीन महामार्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या महामार्गाची लांबी अंदाजे ११० किलोमीटर असेल. या महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिरूर ते कर्जत हा महामार्ग दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ६० किलोमीटरचा चार पदरी महामार्ग बांधण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ५० किलोमीटरचा सहा पदरी महामार्ग बांधण्यात येणार आहे.
पुण्यालगतची अनेक प्रमुख शहरे या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतूकीचा ताण देखील कमी होईल. अशी अपेक्षा आहे. सद्य:स्थितीत मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जावे लागते. चाकण आणि शिरुर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामुळे (एमआयडीसी) नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. या वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी नव्या महामार्गाची बांधणी करण्यात येत आहे.