पुणे : शास्त्रीनगर-वाघोली रोड वाहतूक होणार वेगवान

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विमाननगर चौक ते सोमनाथनगर चौकापर्यंतचा बीआरटी मार्ग काढण्याची परवानगी पुणे शहर वाहतूक पोलीसांनी महापालिकेकडे मागितली आहे.

Wagholi Road Traffic

पुणे : शास्त्रीनगर-वाघोली रोड वाहतूक होणार वेगवान

विमाननगर चौक ते सोमनाथनगर चौकापर्यंतचा बीआरटी मार्ग काढणार विमाननगर चौक बंद करून सोमनाथनगर कॉर्नर, अग्निबाजसमोर वाहनांसाठी यू टर्न

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विमाननगर  चौक ते सोमनाथनगर चौकापर्यंतचा बीआरटी मार्ग काढण्याची परवानगी पुणे शहर वाहतूक पोलीसांनी महापालिकेकडे मागितली आहे.  

यासह विमाननगर चौक  बंद करून वाहनांसाठी यु टर्न फिनिक्स मॉलच्या अलिकडे अग्निबाज केंद्र व सोमनाथनगर कॉर्नर येथे देण्यात  येणार आहे.  त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहने विनासायास थेट वाघोलीकडे सुसाट जातील. तर वाघोलीकडून येणारी वाहने थेट शास्त्रीनगर चौका पर्यंत येतील. त्यामुळे नगर ररस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

 नगर रस्त्यावर सध्या विमाननगर चौकामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे निरीक्षण पुणे शहर वाहतूक पोलीसांनी नोंदविले आहे. विमाननगर चौकात नगर रस्त्यावरील वाहने आणि फिनिक्स मॉलकडे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे विमाननगर चौक वाहनांना वळसा घालण्यासाठी बंद केल्यास पुण्याकडून वाघोलीकडे जाणारी वाहने व वाघोलीकडून पुण्याकडे येणारी वाहने थेट जातील. ज्यांना यू टर्न घ्यायचा आहे, अशी वाहने अग्निबाज केंद्र आणि सोमनाथनगर कॉर्नर येथे तो घेऊ शकतात.  

 विमाननगर चौक ते सोमनाथनगर कॉर्नरपर्यंतचा बीआरटी मार्ग काढण्याची परवानगी पुणे शहर वाहतूक विभागाने पुणे महापालिकेकडे मागितली आहे. त्यासाठी त्यांनी वाहतूक कोंडी आणि बीआरटी मार्गात आतापर्यंत झालेल्या अपघाताची माहिती दिली आहे. विमाननगर चौकात वाहनांना वळसा घालण्यासाठीचा मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी विमाननगर चौकाच्या अलीकडे अग्निबाज या सैन्यदलाच्या केंद्राजवळ रस्ता दुभाजक तोडून वाहनांसाठी यू टर्न देण्यात येणार आहे.  सोमनाथनगर चौकात आधीपासूनच यू टर्नची सोय आहे.  त्यामुळे नगर रस्त्याने वाघोलीकडे जाणाण्यासाठी तर वाघोलीकडून शास्त्रीनगर चौकाकडे येण्यासाठी वाहनांना विनासायास जाता-येता येणार आहे.

तज्ज्ञ म्हणतात, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, बीआरटी काढून टाकण्याऐवजी सक्षम करणे गरजेचे

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी बीआरटीची आवश्‍यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडचा विस्तार पाहता मेट्रोसह पीएमपीच्या बस सेवेसह बीआरटीसुद्धा आवश्‍यक आहे. केंद्र सरकाने दिलेल्या कोट्यवधी रूपयांच्या निधीमधून बीआरटी मार्ग तयार करण्यात आले. मात्र, बीआरटी सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी बीआरटी मार्ग काढून टाकणे हा पर्याय नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दहापैकी साडेपाच किलोमीटर बीआरटी मार्ग शिल्लक राहणार

 पर्णकुटी चौक ते खराडी जकात नाक्यापर्यंत दहा किलोमीटर बीआरटी मार्ग बांधण्यात आला होता. त्यापैकी पर्णकुटी चौक ते विमाननगर चौकादरम्यान (फिनिक्स मॉल) असलेल्या चार किमी अंतरावरील बीआरटी मार्ग काढून टाकण्यात आला आहे. आता पुणे शहर वाहतूक विभागाने विमाननगर चौक ते सोमनाथनगर कॉर्नरपर्यंतच्या पाचशे मीटर अंतरावरील बीआरटी मार्ग काढण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली आहे. त्यामुळे आता सोमनाथनगर कॉर्नर ते खराडी जकात नाक्यापर्यंतचा साडेपाच किलोमीटर अंतराचे बीआरटी मार्ग शिल्लक राहणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest