ब्रेक निकामी झाल्यावर प्रसंगावधान दाखवत चालक शंकर भगवान ठाकूरने झाडाला धडकवून थांबवली बस
राहुल देशमुख / ईश्वरी जेधे
भरधाव वेगाने धावणाऱ्या पीएमपीएमल बसचे ब्रेक अचानक निकामी झाले, स्टिअरिंगचा रॉडही तुटला. अशा स्थितीत बसमधील प्रवाशांच्या जिवाला धोका होताच, पण रस्त्यावरील वाहनांनाही बस धडकल्यास मोठा अपघात होण्याची भीती होती. मात्र, प्रसंगावधान राखून चालक शंकर भगवान ठाकूर यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून बस वळवली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला धडकवल्याने प्रवाशांचे प्राण वाचले.
रविवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गणेशखिंड रस्त्यावर हा थरार घडला. चालक शंकर भगवान बस घेऊन गणेशखिंड रस्त्याने निघाले होते. या वेळी बसमध्ये सुमारे २५ प्रवासी होते. बस धावत असतानाच त्यांच्या लक्षात आले की, ब्रेक निकामी झाले आहेत. त्याच वेळी बसचा स्टिअरिंग रॉडही तुटल्याचे लक्षात आले. ब्रेकविना बस अनियंत्रित होऊन रस्त्यावरील इतर वाहनांना धडकत जाण्याची भीती होती. त्यामुळे परिस्थिती समजून घेत शंकर यांनी तातडीने निर्णय घेतला. त्यांनी आपले संपूर्ण कौशल्य, अनुभव आणि ताकद पणाला लावून आणि प्रयत्नांची शर्थ करून बस रस्त्याच्या कडेला आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांना समोरच एक चिंचेचे झाड दिसले. एखाद्या वाहनाला बस धडकली, तर अनर्थ होईल, म्हणून त्यांनी चिंचेच्या झाडाला बस धडकवली. त्यामुळे छोटासाच झटका बसून बस थांबली. यामध्ये तीन ते चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले, तर इतरांना कोणतीही इजा झाली नाही.
बस झाडावर आदळल्याने फांद्यांची मोडतोड झाली. बसच्या काचेचे नुकसान झाले. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रवाशांसह सर्वांनीच चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी हा सगळा प्रकार पाहिल्यावर शंकर भगवान यांच्यावर गुन्हा दाखल केला नाहीच, उलट त्यांचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले.
बसचालक शंकर भगवान म्हणाले, 'ही माझी दिवसातील शेवटची फेरी होती. गणेशखिंड रस्त्यावर बस चालवत असताना अचानक स्टेअरिंग रॉड आणि ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने बसचे नियंत्रण सुटले. या वेळी माझ्या मनात केवळ प्रवाशांच्या सुरक्षेचाच विचार होता. त्यामुळे मी अगदी जीव खाऊन स्टिअरिंग वळविले आणि चिंचेच्या झाडाला बस धडकवली. त्यामुळे प्रवाशांना जोरदार धक्का बसला. अनेक जण आपल्या जागेवरून उडाले. त्यामुळे गोंधळ उडाला होता.'
बसचे कंडक्टर गणेश भोये म्हणाले, 'कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु २ ते ३ प्रवासी जखमी झाले. त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी औंध रुग्णालयात हलविण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूपपणे बसमधून खाली उतरल्यावरच त्यांना नक्की काय घडले हे सांगितले.'
बसमधील एक प्रवासी विमल शिंदे यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोठी गर्दी होती. त्यामध्येही बसचालकाने कौशल्याने गर्दीतून बस बाहेर काढत झाडावर आदळविली. त्यामुळे आम्हा सगळ्याच प्रवाशांचे प्राण वाचले.
घटनास्थळाजवळ असलेल्या एका दुकानाचे मालक शानशत खान म्हणाले, 'बस झाडावर धडकल्यावर मोठा आवाज आला. मोठी गर्दी झाली होती. नक्की काय झाले हे कोणालाही समजले नव्हते. मात्र, बसचालकाने खाली उतरल्यावर सगळा प्रकार सांगितला. लोकांनी जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात नेले. हे झाड नसते, तर काय परिस्थिती झाली असती याची कल्पनाही करवत नाही.'
चतु:श्रृंगी पोलिसांचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, 'या घटनेनंतर बसचालक शंकर भगवान यांना तातडीने पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी दाखविलेले धाडस खरोखरच अतुलनीय आहे. एखाद्या हिरोप्रमाणे त्यांची कामगिरी आहे.'
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.