संग्रहित छायाचित्र
पुणे : ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त व कार्यवाह डॉ. किरण ठाकुर (वय ७७) यांचे आज (शनिवार) निधन झाले. अंत्यदर्शनासाठी दुपारी १ ते २ पर्यंत त्यांचा देह पत्रकारनगर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे .
डॉ. किरण ठाकुर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. तसेच नानासाहेब परुळेकर पत्रकारिता विभागाचे ते संचालक होते. तसेच पत्रकार प्रतिष्ठानच्या स्थापनेत आणि पत्रकार भवनाच्या इमारतीच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पत्रकारांसाठी असलेल्या या संस्थांनी मोठी उंची गाठली आहे.
डॉ. किरण ठाकूर यांनी तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केली. पुणे डेलीमध्ये उपसंपादक आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (यूएनआय) या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले. डॉ. ठाकूर यांनी भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या या विषयावर पीएचडी संशोधन केले. अनेक शोधनिबंधांबरोबरच न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नालिझम आदी पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.
त्यांच्या इच्छेनुसार, निधनानंतर त्यांचे पार्थिव देहदानासाठी दान करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. पत्रकारितेतील त्यांच्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.