संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या १ जानेवारीला कोरेगाव-भिमा दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पीएमपीएमएलकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. कोरेगांव-भिमा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भीमअनुयायी उपस्थित राहत असतात. त्यांच्या सोयीसाठी तसेच येणारी वाढीव प्रवासी संख्या विचारात घेवून पीएमपीएमएलने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी जादा बसेसचे नियोजन केले आहे.
पीएमपीएमएलने खाली दिलेल्या ठिकाणांवरून भिमा कोरेगांव विजयस्तंभापर्यंत मोफत बससेवा असणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, इतर मार्गांच्या बसेसने प्रवाशांनी या पार्किंगपर्यंत तिकीट घेऊन प्रवास करावा असे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात आले आहे.
लोणीकंद विभाग:
- ३१ डिसेंबरला दुपारी चार ते पहाटे चार पर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, चिंचबन, फुलगाव शाळा व पेरणे गाव ७५ मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
- १ जानेवारीला पहाटे चार ते रात्री १२ वाजेपर्यंत तुळापूर फाटा, चिंचबन, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, फुलगाव शाळा, पेरणे गाव येथून पेरणे टोल नाका पर्यंत २५० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
शिक्रापूर विभाग:
- ३१ डिसेंबरला सकाळी ७ वाजेपासून शिक्रापूर रोड, जीत पार्किंग, वक्फ बोर्ड, नगर रस्ता, पिंपळे जगताप पार्किंग, चाकण रोड, ते भिमा कोरेगांव विजयस्तंभ पर्यंत १४० बसेस आणि वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल ते वढू पर्यंत १० बसेस अशा एकूण १५० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
- १ जानेवारीला पहाटे ४ ते रात्री १२ पर्यंत शिक्रापूर रोड, जीत पार्किंग, वक्फ बोर्ड, पिंपळे जगताप पार्किंग, चाकण रोड येथून ३५० बसेस व वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल ते वढू पर्यंत ३० बसेस अशा एकूण ३८० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
यासोबतच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध स्थानकांवरून प्रवास भाडे आकारणी करून लोणीकंद कुस्ती मैदानपर्यंत जादा बसेसचे नियोजन देखील करण्यात आले आहे.
तसेच १ जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्याकरिता येणाऱ्या अनुयायांची पुणेस्टेशन, ससून रोड व मोलेडीना बसस्थानकावर प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे ससून रोड व मोलेडीना बसस्थानकावरून सुटणारे सर्व बसमार्ग सकाळपाळीत पुणेस्टेशन डेपो बसस्थानकातून संचलनात राहणार आहेत. तसेच पुलगेटकडून येरवडा, आळंदी कडे जाणारे बसमार्ग जी.पी.ओ., पुणेस्टेशन डेपो, अलंकार टॉकीज मार्गे संचलनात राहतील. मात्र हे बदल फक्त सकाळ पाळीमध्येच करण्यात आलेले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.