संग्रहित छायाचित्र
पुणे, दिनांक २७ डिसेंबर मोटरस्पोर्ट्समधील रॅली प्रकारातील सर्वाधिक खडतर मानल्या जाणाऱ्या तसेच जगप्रसिद्धही असलेल्या डकार रॅलीत पुण्याचा संजय टकले नववर्षात भारताचा डंका वाजवेल. या रॅलीत कार विभागात भारतीय स्पर्धक प्रथमच सहभागी होत आहे. सौदी अरेबियात तीन जानेवारीपासून या रॅलीला प्रारंभ होत आहे.
आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील (एपीआरसी) माजी विजेता असलेला ५५ वर्षीय संजय या रॅलीसाठी सज्ज झाला आहे. फ्रान्सच्या कोंपानी सहरीयेन या संघाकडून तो सहभागी होईल. फ्रान्सचा मॅक्सीम राऊद हा संजयचा नॅव्हीगेटर असेल. मॅक्सीम ३३ वर्षांचा असून त्याने डकार रॅली तीन वेळा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. संजय टोयोटा एचझेडजे ७८ या मॉडेलची कार चालवेल. तो क्लासिक गटात सहभागी होईल.
वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि एकूणच भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठत असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावना संजयने पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पीवायसी हिंदू जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत संजयच्या जर्सीचे अनावरण हिमालयन रॅलीचा अनुभव असलेले क्रीडा संघटक अनिरुद्ध देशपांडे यांच्याहस्ते झाले. यावेळी ध्वजप्रदान कार्यक्रमही झाला. देशपांडे तसेच महाराष्ट्र ऑटोमोटीव्ह क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत आपटे यांच्याहस्ते संजयकडे तिरंगा देण्यात आला.
नववर्षाच्या प्रारंभासाठी एक रेसिंग ड्रायव्हर म्हणून याविषयी काय भावना वाटते, या प्रश्नावर तो म्हणाला की, डकार ही रॅलींची जननी मानली जाते. इतक्या आव्हानात्मक रॅलीत संधी मिळणे हीच मुळात मोठी आनंदाची बाब आहे.
प्रेरणा वेगाचीच
डकारचे स्वप्न केव्हा पाहिले आणि त्यासाठी काय प्रेरणा होती, या प्रश्नावर संजय म्हणाला, १९८७ मध्ये मोटोक्रॉसने रेसिंगमधील कारकिर्द सुरु केल्यानंतर मी त्यातील वेगवेगळ्या प्रकारांत शेकडो करंडक जिंकले. वयानुसार बाईक रेसिंग जास्त करणे शक्य नव्हते. मात्र जीवनात वेगाशी अर्थात स्पीडशी जुळलेने नाते तोडणे अशक्य होते. त्यामुळे कार रेसिंग अर्थात रॅलीकडे वळलो. जागतिक रॅली मालिका (डब्ल्यूआरसी) आणि डकार अशी दोन उद्दीष्टे ठेवली होती. त्यातील जागतिक रॅली मालिकेतही फिनलंडमधील जगप्रसिद्ध अशा रॅलीत मी सहभागी झालो. आता डकारच्या रुपाने दुसरे स्वप्न साकारण्यासाठी मी सज्ज झालो आहे.
डकारचे आव्हान
एकूण १५ दिवसांचा कालावधी असलेल्या रॅलीत स्पर्धकांना एकाच दिवसाची विश्रांती मिळेल. तीन जानेवारीला प्राथमिक फेरी होईल. त्यानंतर पाच दिवसांनी ब्रेक मिळेल. त्यानंतर सात दिवसांचा दुसरा टप्पा होईल. एकूण १२ फेऱ्या (स्टेजेस) असलेल्या रॅलीचे एकूण अंतर आठ हजार किलोमीटरच्या घरात आहे. यातील विशेष फेऱ्यांचे अंतर सुमारे सव्वा पाच हजार किमी आहे.
दुसऱ्याच दिवशी कस
या रॅलीत तीन जानेवारीला प्राथमिक फेरी होईल. चार जानेवारीला ५०० किलोमीटर अंतराची पहिली स्टेज होईल. त्यानंतर दुसऱ्याच स्टेजमध्ये स्पर्धकांचा कस लागेल. ५ व ६ जानेवारी अशा दोन दिवशी ४८ तासांच्या या स्टेजमध्ये स्पर्धकांना तब्बल १ एक हजार ५७ किलोमीटर अंतर पार करावे लागेल. यातील ९६५ किमी अंतर विशेष फेरीचे असेल. पहिला टप्पा पाच दिवस चालेल. त्यानंतर स्पर्धकांना एकाच दिवसाचा ब्रेक मिळेल. मग दुसरा टप्पा सातदिवसांचा असेल.
टप्पागणिक वाटचाल
इतक्या खडतर रॅलीसाठी कशी वाटचाल केली, या प्रश्नावर संजयने सांगितले की, प्रारंभी मी मलेशिया आणि थायलंड या आशिया खंडामधील दोन देशांत वेगवेगळ्या रॅलींमध्ये सहभागी झालो. या रॅली स्पर्धात्मक अंतराच्या निकषानुसार दोन दिवस चालणाऱ्या असतात. डकारसाठी मला जास्त दिवसांच्या स्पर्धात्मक रॅलींमध्ये सहभागी होणे आवश्यक होते. त्यासाठी आशियाई क्रॉस कंट्री रॅलीत भाग घेतला. आतापर्यंत मी आशियाई क्रॉस कंट्री रॅलींमध्ये सहभागी झालो आहे. ऑगस्ट महिन्यातच मी याआधीची क्रॉस कंट्री रॅली केली.
मोरोक्कोच्या वाळवंटात सराव
फ्रान्सच्या संघासह संजयने यंदा कसून सराव केला आहे. यात मोरोक्कोच्या वाळवंटातील तयारीचाही समावेश आहे. याविषयी माहिती विचारली असता, संजय म्हणाला की, अलिकडेच मी मोरोक्कोत तीन दिवस सराव केला. इराकेबिया जवळील वाळवंटात एक दिवस आम्ही एकूण दहा तास कार चालवित होतो. मोरोक्को आणि सौदी अरेबियातील वाळवंटात काही समान बाबी आहेत. या रॅलींचा मार्ग वाळूच्या मोठ्या ढिगाऱ्यांमधून जाणारा असतो. त्यामुळे कार कितीही शक्तीशाली असली तरी ताकद पणाला लावून ती चालवावी लागते. त्यादृष्टिने मोरोक्कोतील सरावात काही उपयुक्त गोष्टी शिकता आल्या.
संजय महत्त्वाचा
या १२ दिवस चालणाऱ्या रॅलीसाठी मानसिक दृष्टिकोन कसा असेल आणि उद्दीष्ट काय ठेवले आहे, या प्रश्नावर संजयने सांगितले की, एका वेळी एक फेरी आणि एक दिवस असाच दृष्टिकोन ठेवावा लागेल. एकीकडे शारीरिक पातळीवर माझी ऊर्जा आणि दुसरीकडे तांत्रिक पातळीवर कारची क्षमता नियंत्रित पद्धतीने वापरावी लागेल. अंतर आणि दिवस पाहता सुरवातीलाच वेग ठेवून चालणार नाही. त्यामुळे वेग आणि आक्रमक दृष्टिकोनाच्या जोडीला संयमही लागेल.
नॅव्हीगेटर अनुभवी
संजयने आतापर्यंत वेगवेगळ्या नॅव्हीगेटर बरोबर रॅली केल्या आहेत. नॅव्हीगेटरबरोबरील समन्वय रॅलीत महत्त्वाचा असतो. मॅक्सिमाविषयी संजय म्हणाला की, त्याची आणि माझी अद्याप भेट झालेली नाही. आम्ही दूरध्वनीवरच संवाद साधला आहे. तो अनुभवी आहे. मुख्य म्हणजे तीन डकार पूर्ण केल्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. महत्ताचे म्हणजे तो एक उत्तम मेकॅनिक आहे.
एकूण दिवस - १२
एकूण स्टेजेस - १२
एकूण अंतर ७८०५
विशेष फेऱ्यांचे एकूण अंतर - ५२०९
पहिला टप्पा - ५ दिवस
दुसरा टप्पा - ७ दिवस
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.