संग्रहित छायाचित्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रूपांतर मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये कसे होत आहे याची प्रचिती गेल्या काही दिवसांपासून येत आहे. राजकीय पाहुणे, सिनेट, मॅनेजमेंट कौन्सिल आणि प्राध्यापकांसाठी असलेल्या व्हीआयपी गेस्ट हाऊसमधील १२ खोल्या लग्नाच्या वऱ्हाडासाठी बुक केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या तोंडी आदेशानंतर या खोल्या बुक केल्यामुळे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आणि प्राध्यापकांची गैरसोय झाल्यामुळे त्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
सुरक्षा विभागप्रमुखांच्या कुटुंबात विवाह समारंभ आहे. विवाहस्थळ विद्यापीठ आवाराच्या बाहेर असले तरी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, पाहुण्यांसाठी विद्यापीठातील व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये तब्बल १२ खोल्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. काही प्राध्यापक, सिनेट सदस्य गुरुवारी (२६ डिसेंबर) मॅनेजमेंट कौन्सिल बैठकीसाठी आले होते.
पुणे जिल्ह्यासह नगर आणि नाशिकवरून आलेल्या सदस्यांची गैरसोय झाल्यामुळे हा विषय थेट मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत उपस्थित झाला. मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्राध्यापक संदीप पालवे यांनी विवाह समारंभासाठी दोन ते तीन दिवस गेस्ट हाऊस वापरणे ठिक आहे. परंतु आठ दिवस खोल्या का बुक केल्या आहेत. कोणाच्या आदेशानुसार खोल्यांची बुकिंग झाली आहे. त्याचे भाडे नेमके कोण भरणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देणे टाळले. विद्यापीठाचे गेस्ट हाऊस मॅनेजर ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याकडे गेस्ट हाऊस बुकिंग संदर्भात 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. तसेच कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव डॉ.ज्योती भाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
अनेक विद्यार्थी, पालक आणि परराज्यातून संशोधनासाठी आपल्या विद्यापीठात येणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना कुठल्या तरी विभागाच्या प्रमुखांचे पत्र दिल्याशिवाय गेस्ट हाऊसमध्ये रूम मिळत नाही. जाणीवपूर्वक माणसे पाहून टाळाटाळ केली जाते. विद्यार्थ्यांकडून प्रतिदिन ३०० रुपये आकारले जातात. इतर विद्यापीठाच्या तुलनेमध्ये ही रक्कम खूप जास्त आहे. एकूणच गेस्ट हाऊस हा विशिष्ट लोकांचा अड्डा बनला आहे. मनमानी पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून काही ठराविकच लोक गेस्ट हाऊसमध्ये राहतात. गेल्या वर्षभरामध्ये कोणाच्या शिफारशीने खोल्या देण्यात आल्या याची चौकशी झाली पाहिजे. गंभीर बाब म्हणजे कुलगुरू आणि प्रशासन यावर काहीच कार्यवाही करत नाही.
- राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.