संग्रहित छायाचित्र
पुणे : दोन पवार एकत्र आले तर शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांची कुचंबणा होईल. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडण्यात अंकुश काकडे आणि त्यांच्यासारख्या इतर नेत्यांचाच जास्त सहभाग आहे. उद्या अजित पवारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तरी तो आम्हाला मान्य असेल. तसेच, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी तो निर्णय आम्हाला मान्यच असेल, असे रोखठोक मत रुपाली पाटील-ठोंबरे यांनी व्यक्त केले. उद्या जर दोन्ही गट एकत्र आले तर, अजित पवारांवर बेछूट आरोप करणाऱ्या नेत्यांचीच अधिक कुचंबणा होईल, असेही त्या म्हणाल्या.
दोन्ही पवारांनी एकत्र यावे की नाही याविषयीची चर्चा १२ डिसेंबर पासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भेटीगाठींदरम्यान अजित पवार यांनी सहपरिवार शरद पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी ‘मूठ घट्ट असेल तर ताकद वाढते’, असे सूचक विधान केले होते.
राजकीय विश्वात या व्यक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. याविषयी दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यातच, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणल्या, की सुनंदा पवार या कुटुंबाचा घटक आहेत. त्यामुळे, त्यांनी आपुलकीपोटी एकत्र येण्याची भावना बोलून दाखवली. आमच्यासाठी अजित पवार जो निर्णय घेतील, तो महत्त्वाचा असेल. जेव्हा फूट पडली, तेव्हा प्रत्येकालाच याबद्दल दुःख वाटले होते. वेगळे न होता आपली वज्रमूठ घट्ट राहिली पाहीजे, असे सर्वांनाच वाटते. लोकसभा आणि विधानसभेच्या निकालानंतरही अजित पवार यांनी समोरच्या लोकांवर टीका केली नाही. पण, शरद पवार यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनीच अजित पवारांवर नको ती टीका केली”, असा घणाघात त्यांनी केला.