आरटीओला दिसेना खासगी वाहनांची भाडेवाढ
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
उन्हाळी सुट्ट्यानिमित्त खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या तिप्पट तिकीटदर आकारले जात असताना प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केलेल्या कारवाईत १७ जणांपैकी केवळ एकानेच तिकिटासाठी अधिक पैसे उकळल्याचे उघड झाले आहे. अन्य सोळाजणांवर परमिट नसणे, कर न भरणे अशा अन्य कारणांमुळे कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आरटीओच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नोकरी-धंद्यासाठी राज्याच्या इतर जिल्ह्यांसह देशभरातून लोक पुण्यात वास्तव्यास आहेत. शिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी किमान लाखभर विद्यार्थी परजिल्ह्यातून पुण्यात वास्तव्याला आले आहेत. उन्हाळी अथवा दिवाळी सुट्ट्यांमधे ते आपल्या गावाला जात असतात. उन्हाळी सुट्ट्यांसाठी कधी पर्यटनाला, नातेवाईकांच्या भेटीला अथवा गावाला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे उन्हाळी हंगामात सर्वच प्रवासी वाहनांना गर्दी असते. सध्या रेल्वेच्या तिकिटासाठी दोन महिन्यांचे वेटिंग आहे. एसटीच्या लांब पल्ल्याच्या बसलाही गर्दी होत आहे. त्यामुळे अनेकांना पर्याय नसल्याने खासगी प्रवासी वाहनांचा आश्रय घ्यावा लागतो. या हंगामात खासगी ट्रॅव्हल्सकडून मनमानी भाडे आकारले जाते.
त्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयाने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगरजाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मोहीम राबवली. या पथकाने १७ जणांवर कारवाई केली. मात्र, त्यातील १६ जणांवर परमिट नसणे, कर न भरणे, नोंदणी नसणे अशा कारणांसाठी कारवाई करण्यात आली, तर अवघ्या एकावरच अधिक भाडे आकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांची संकेतस्थळे उघडून पाहिली तरी त्यांची भाडेवाढ लक्षात येते. मात्र, आरटीओला ही भाडेवाढ कशी लक्षात आली नाही, असा प्रश्न प्रवासी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.