संग्रहित छायाचित्र
पुणे -सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा पुरम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रमोटर्स आणि डेव्हलपर्स यांनी सोसायटी स्थापन होऊनही प्रत्येक फ्लॅट धारकाकडून देखभालीसाठी घेतलेली रक्कम सोसायटीला अनेक वेळा पाठपुरावा करूनही दिली नाही. तसेच सहकारी संस्थेचे हस्तांतरण केले नाही. सदनिकांची पूर्ण रकमा घेऊन देखील प्रकल्पातील कामे पूर्ण न करून विश्वासघात केला. याच्या निषेधार्थ प्रयेजा पुरम येथील रहिवाशांनी शनिवारी सिंहगड रोड वरील प्रयेजा सिटी येथील बिल्डरच्या सेल्स ऑफिस समोर दिवसभर धरणे आंदोलन केले. तसेच सर्व रहिवाशांनी बिल्डरच्या सेल्स ऑफिसमध्ये रात्रभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून सर्व रहिवासी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत.
या संदर्भात सोसायटीच्या वतीने पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे. मेसर्स भंडारी गेलडा असोसिएटस यांच्यावतीने विजय बंडुलाल भंडारी व प्रयेजा डेव्हलपर्स तर्फे संदीप नारायण जानी यांनी हा प्रकल्प बांधलेला आहे. या प्रकल्पामध्ये 108 सदनिका व चार दुकाने आहेत.
बिल्डरने प्रकल्पाच्या देखभालीसाठी काही सदनिका धारकांकडून दोन वर्षाचा तर काही सदनिका धारकांकडून तीन वर्षांच्या रकमा घेतलेल्या आहेत. सोसायटीची स्थापना होऊनही बिल्डर सहकारी संस्थेचे हस्तांतरण आणि महत्त्वाचे म्हणजे बिल्डरकडे देखभाल शुल्कापोटी सुमारे 28 लाखांची रक्कम अनेक वेळा पाठपुरावा करूनही सोसायटीला हस्तांतरित करत नाही याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे.
बिल्डर कडून ही रक्कम न मिळाल्यामुळे अनेक वेळा सोसायटीतील रहिवाशांना विजेचे बिल भरता न आल्याने मीटर काढून नेण्यात आले आहे. तर लिफ्ट बंद पडल्यामुळे जेष्ठ नागरिकांना त्रास झाला आहे. त्यामुळे काही झाले तरी बिल्डर त्यांच्याकडे असलेली सोसायटीची रक्कम देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका प्रयेजा पुरम येथील रहिवाशांनी घेतली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.