संग्रहित छायाचित्र
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ड्रेनेज चेंबरच्या झाकणांची दुरुस्ती करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. आतापर्यंत ४०७ चेंबरची दुरुस्ती करण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीत नसल्याने वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. चेंबरमुळे होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघात होतात, तसेच पाठदुखी, कंबरदुखीचाही त्रास वाहनचालकांनी होऊ लागला आहे. याबाबतच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ड्रेनेज चेबंरची झाकणे दुरुस्ती करण्याची मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत ४०७ चेंबरची दुरुस्ती करण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या समतल ड्रेनेज चेंबर राहिलेले नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या मध्येच एक प्रकारचे खड्डेच तयार झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारींनंतर महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीत आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. १५ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चेंबर दुरुस्ती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १२ मीटरच्या आतील रस्त्यांवरील चेंबर दुरुस्ती केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिली.
शहरात ड्रेनेजसह, केबल्स, पावसाळी वाहिन्या आदींसाठी चेंबर खोदण्यात आली आहेत. मात्र, एकाही रस्त्यावर चेंबरची झाकणे रस्त्याच्या समपातळीत नाहीत. बहुतांश ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी उंचवटाही झाला आहे. यामुळे वारंवार अपघात होतात. याशिवाय खड्ड्यातून वाहन गेल्याने वाहनचालकांना पाठदुखी, कंबरदुखीचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेकडे सातत्याने तक्रारी केल्या जातात. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका चेंबरची झाकणे उचलून घेते. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नाही.
‘‘महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराने शहरातील सर्व रस्त्यांवरील चेंबरच्या झाकणांची आणि त्यामुळे झालेल्या खड्ड्यांची माहिती संकलित केली आहे. ती फोटो आणि अक्षांश-रेखांशासह पालिकेकडे उपलब्ध आहे. पालिकेच्या हद्दीसह समाविष्ट गावांमध्ये दीडहजारांहून अधिक चेंबर्स आहेत. या माहितीनुसार कामाला सुरुवात केली आहे.पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चेंबरची झाकणे उचलून समपातळीत आणली जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र तरतूद केलेली नाही. पथविभागासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीतूनच हा खर्च केला जाणार आहे,’’ असेही पावसकर यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.