पुणे: येरवडा मेट्रो स्थानकाचा अखेर जुलैत मुहूर्त!

दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेले येरवडा येथील महामेट्रोचे स्थानक जुलै महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सव्वा लाख प्रवासी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

संग्रहित छायाचित्र

मेट्रोच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या सव्वा लाखाने वाढणार असल्याचा अंदाज, परिसरात फिडर बस सेवा आवश्यक

दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेले येरवडा येथील महामेट्रोचे स्थानक जुलै महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सव्वा लाख प्रवासी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या भागातून मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढावी, याकरिता यासाठी येरवडा परिसरातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, शास्त्रीनगर सरकारी वसाहत, फुलेनगर, प्रतीकनगर अशा परिसरातून पीएमपी बसची फिडर सेवा देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, नोकरदार, कष्टकरी वर्गाला मेट्रो प्रवासाचा फायदा होणार असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) येरवडा मेट्रोस्थानकाचा जिना राष्ट्रीय क्रीडा मार्गाच्या मधोमध बांधला जात होता. त्यामुळे येरवडा बसथांब्याच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होत होती. विशेष म्हणजे महापालिकेने परवानगी दिली नसतानाही मेट्रो जिना उभारत असल्याचे समोर आले होते. जिन्याचे बांधकाम काढून घेईपर्यंत मेट्रोचे काम सुरू करू देणार नसल्याची भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली होती. त्यामुळे महामेट्रोने येरवडा मेट्रो स्थानकाचे आणि जिन्याचे काम सहा महिने बंद ठेवले होते.

वनाझ ते रामवाडीच्या तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्ग सुरू करण्याची घाई असल्यामुळे तब्बल सहा महिने (ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४) येरवड्याच्या स्थानकाकडे दुर्लक्ष केले गेले होते.

यावर्षी मार्च महिन्यात रुबी हॉल ते रामवाडी या तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून  केले. यावेळी येरवडा मेट्रो स्थानक एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याचे महामेट्रोने सांगितले होते. त्यानंतर तारीख पे तारीख देत अखेर आता जुलैचा मुहुर्त निश्चित करण्यात आल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.  त्यामुळे येरवडा मेट्रो स्टेशन सुरू झाल्यानंतर या ठिकाणावरून मेट्रोचे प्रवासी संख्या वाढणार आहे. येरवडा परिसरातून दैनंदिन प्रवासी संख्या पंचवीस ते तीस हजाराने वाढणार असल्याचा अंदाज आहे. सध्या मेट्रोची प्रवासी संख्या नव्वद हजार असून येरवडा मेट्रो स्थानक सुरू झाल्यास ते सव्वा लाखापर्यंत वाढू शकते, असा अंदाज आहे.  

येरवडा परिसराची लोकसंख्या दीड लाख आहे. त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक (Yerwada Metro Station) सुरू झाल्यास येथील कष्टकरी, मध्यमवर्गीय, विद्यार्थी, चाकरमानी, खासगी नोकरदारांना मेट्रोमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जाता येणार आहे. सध्या मेट्रोची प्रवासी संख्या नव्वद हजारावर गेली आहे. आता येरवडा मेट्रो स्थानक सुरू झाल्यास ही संख्या सव्वा लाखापर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. 

येरवडा मेट्रो स्थानकाला महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, शास्त्रीनगर सरकारी सहकारी वसाहत, राम सोसायटी, फुलेनगर, प्रतीकनगर, येरवडा प्रीझन प्रेस अशा ठिकाणी पीएमपीएलची फिडर बससेवा उपयोगी ठरू शकते. या परिसरातून दररोज हजारो प्रवासी मेट्रोला मिळतील, अशी आशा आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे  येरवडा मेट्रो स्थानक सुरू करता आली नव्हते. आता हे मेट्रो स्थानक जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होणे अपेक्षित आहे.
- हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest