संग्रहित छायाचित्र
पुणे: येरवडा मध्यवर्ती कारागृहातील तीस बराकींची कैदी क्षमता २,३२३ असताना येथे तब्बल साडेसहा हजार कैदी दाटीवाटीने राहात आहेत. त्यामुळे खुल्या कारागृहाच्या शेजारील तीस एकर जागेत प्रत्येकी चार हजार कैदी क्षमता असलेले दोन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारला दिला आहे.
आठ हजार कैदी क्षमतेची दोन कारागृहे केवळ कच्च्या कैद्यांसाठी बांधण्याचा हा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळ या दोन कारागृहांचे बांधकाम करणार आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती कारागृह प्रशासनाने ‘सीविक मिरर’ला दिली.
कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराकी आहेत. सर्कल दोनमध्ये सहा तर किशोर विभागात तीन बराकी आहेत. यासह अंडासेल, फाशीची शिक्षा सुनावलेले कैदी, रुग्ण कैदी, ज्येष्ठ नागरिक कैदी, विदेशी कैदी अशांना दाटीवाटीने विविध बाराकींमध्ये ठेवले आहे. यातील सुमारे सत्तर टक्के कच्चे कैदी आहेत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी कच्च्या कैद्यांची संख्या विचारात घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र कारागृहाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने कारागृह प्रशासनाच्या संमतीने राज्य सरकारकडे पाठविला होता.
आता कैद्यांची पुढील काही वर्षांतील संख्या विचारात घेता चार हजार क्षमतेच्या प्रत्येकी दोन कारागृहांची आवश्यकता आहे. यासाठी येरवडा खुल्या कारागृहाची काही एकर जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कारागृहाच्या प्रशासनाच्या सोईनुसार येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या शेजारीच ही दोन प्रशस्त कारागृो बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात केवळ शिक्षा झालेले पक्के कैदी ठेवले जाणार आहेत.
नवीन कारागृहाची इमारत तळ आणि पहिला मजला अशी असणार आहे. समोरच्या बाजूला प्रशासकीय इमारत, वरिष्ठ तुरूंगाधिकारी, तुरूंग अधिकारी यांचे कार्यालय असणार आहे. मध्यवर्ती भागात सेंट्रल किचन, गिरणी, किचनशेजारी दोन बराक, धान्य गोदाम, रुग्णालय, प्रयोगशाळा, औषधांची खोली, वैद्यकीय अधिकाऱ्यांची खोली, पन्नास खिडक्यांचा मुलाखत कक्ष, ग्रंथालय, प्रतीक्षालय, सराईत गुन्हेगारांसाठी अतिसुरक्षित तीस खोल्या आदी सोईसुविधा असणार आहे.
येरवड्यात जिल्हा फौजदारी न्यायालयाचे काम सुरू
विमानतळ रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक १९१ , बंगला क्रमांक ४ येथील आठ हजार चौरस मीटरमध्ये जिल्हा फौजदारी न्यायालयाची बहुमजली इमारत होत आहे. यामध्ये दोन तळमजली वाहनतळ असून आठ मजली इमारतीत २४ न्यायालये असणार आहेत. प्रमुख जिल्हा न्यायाधिशांमार्फत १८० कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. निधी मंजूर झाल्यामुळे फौजदारी न्यायालयाचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली.
नवीन फौजदारी न्यायालय इमारतीचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये केवळ फौजदारी खटले चालविले जाणार आहेत. येरवडा मध्यवर्ती कारागृहात दरवर्षी विविध गुन्ह्यातील १३ ते १५ हजार आरोपी दाखल होत असतात. यातील ७० टक्के कच्चे कैदी असतात. या सर्वांचे खटले फौजदारी न्यायालयात चालतात. त्यामुळे आरोपींना न्यायालयात हजर करणे, त्यानंतर कारागृहात घेऊन जाणे अवघड असते. त्यामुळे येरवडा कारागृहापासून दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर न्यायालय होणे हे पोलीस, न्यायालय आणि कारागृहाच्या सोईचे तर आहे. यासोबतच वेळेची आणि पैशाचीदेखील बचत होणार आहे.
नवीन कारागृह आठ हजार कैदी क्षमतेचे
- येरवडा मध्यवर्ती कारागृह - ६५ एकरात २,३२३ बंदी क्षमता
- नवीन कारागृह - ३० एकर : तळ आणि पहिला मजला (४००० बंदी क्षमतेचे दोन कारागृह)
- सराईत गुन्हेगारांसाठी - अतिसुरक्षित ३० खोल्या
- बाहेरील सिमाभिंत २१ फूट तर आतील सिमाभिंत दहा फूटी उंचीची