मतदार यादीतून हजारो नावे वगळली; ‘निर्भय बनो’चे विश्वंभर चौधरी यांचेही नाव गायब
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना मतदार यादीतील घोळ मिटविण्यात पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अपयशी ठरल्याचे सोमवारी (दि. १३) पुण्यातील मतदानादरम्यान दिसून आले. शहरातील हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली गेल्याचे धक्कादायक प्रकार मतदानादरम्यान उघडकीस आला.
वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या अनेकांना यावेळी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू न शकल्याने अनेक नागरिकांना धक्का बसला. शहरातील बहुतांश बूथवर सोमवारी हेच चित्र होते. त्यामुळे मतदान केंद्रावरील स्वयंसेवक वैतागून गेले होते. मोठ्या प्रमाणावर नावे गहाळ असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ज्यांनी याच केंद्रावर अनेक वर्षांपासून मतदान केले होते त्यांचीही नावे यादीत नव्हती.
साळुंके विहार येथील मेजर चंदर धवन यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले की, “आम्ही आर्मी कॉलनीत राहतो. माझ्यासोबत अनेक जण लष्करातून निवृत्त झालेले आहेत. मात्र, आमच्यापैकी अनेकांची नावे मतदार यादीत नव्हती. साधारणत: ४० टक्के नावे मतदार यादीत सापडली नाहीत. मला वैयक्तिक माहीत आहेत अशा सहा जणांची नावे मतदार यादीतून हटविण्यात आलेली आहेत. त्यामुळे आम्हाला मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागले.’’
मतदानासाठी सिंगापूरहून येऊनही यादीत नाव नसल्याने निराशा
मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी सिंगापूर येथून आलेले श्रीयश कुलकर्णी यांचे नावही मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. ‘सीविक मिरर’शी बोलताना ते म्हणाले, “मी मतदानासाठी सिंगापूरहून पुण्यात आलो होतो. मात्र, मतदार यादीतून माझे नाव गायब असल्याचे मला आढळून आले. नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी माझ्या वडिलांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. मी बूथवर आलो. मतदार नोंदणीसाठी फॉर्म ६ भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकेल. मात्र, लोकसभेचे मतदान मात्र बुडाले. सिंगापूरहून पुण्याला येण्यासाठी केलेला २५ हजार रुपयांचा खर्च वाया गेला.’’
विमाननगर येथील कोणार्क कॅम्पसचे रहिवासी निखिल नायडू म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून मी मतदान करत आहेत. परंतु यावेळी मतदार यादीत नाव नसल्याने मला मतदान करण्यापासून रोखण्यात आले. आमच्या परिसरातील ३०० हून अधिक जणांचे नाव मतदार यादीत नाही.
मृणालिनी नायडू यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले की, ‘‘जणू जादू व्हावी त्याप्रमाणे आमची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. माझ्या आईसह आमचे शेजारी, मित्रांची नावे यादीत नाहीत. सकाळपासून या केंद्रावरून त्या केंद्रावर आम्ही फिरत आहोत. निवडणूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी मी बोलले. आज मतदान असल्याने काही करता येऊ शकणार नाही. तुम्ही उद्या येऊन तक्रार नोंदवा असे त्यांनी सांगितले. गेल्या २० वर्षांत आमचा पत्ता बदलला नाही मग नाव वगळले कसे गेले?’’
‘‘आम्ही लोकांना त्यांची नावे यादीत शोधण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. पण अनेकांची नावे दिसत नाहीत. ५० टक्के नावे गायब आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी साडेसात वाजल्यापासून फिरत आहेत. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्यांनी २०२२ मध्ये फॉर्म भरला नाही, त्यांची नावे वगळण्यात आली आहेत,’’ अशी माहिती विमाननगर मतदान केंद्राच्या स्वयंसेविका अनिता हनुमंते यांनी दिली.
‘निर्भय बनो’चे विश्वंभर चौधरी यांचे नाव गायब
भारतीय जनता पक्षाविरुद्ध ‘निर्भय बनो’ हे आंदोलन चालविणारे सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांचे नावही मतदार यादीतून गायब झाले. रविवारी (दि. १२) त्यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना आपले नाव मतदार यादीत नसल्याचे समजले होते. पत्ता बदलल्याने नाव वगळले गेल्याचे त्यांना सांगण्यात आले.
मिळकतकराच्या पावतीवर नाव मग मतदार यादीतून कसे गायब झाले?
कोथरूड मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक निलीमा जोशी यांचे नाव मतदार यादीत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. मिळकतकराच्या पावतीवर नाव येते मग मतदार यादीत कसे नाही, असा सवाल करत त्यांनी या सर्व प्रकारावर संताप त्यांनी व्यक्त केला.
म्हणे, तुमच्यासारखे वृद्ध मृत झालेले असावे...
मीरा सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक राजेश्वरी रावत सकाळीच मतदानासाठी गेल्या. त्यांचे नाव मतदार यादीत होते. मात्र, त्यांच्या पतीचे नाव नव्हते. त्यांनी आजपर्यंत कधीही मतदान चुकविलेले नाही. तरीही त्यांचे नाव मतदार यादीत कसे नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महर्षीनगरचे आदिल गोदरेज बरुचा हे ८० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक आहेत. ते म्हणाले, ‘‘मी वयाच्या २१ व्या वर्षापासून प्रत्येक निवडणुकीत मतदान केले आहे. मात्र, मतदार ओळखपत्र असूनही माझे नाव मतदार यादीत नव्हते. माझ्यासोबतच अनेक ज्येष्ठ नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत. संतापजनक म्हणजे तुमच्यासारखे वृद्ध मृत झाले असावे, असा संतापजनक विनोद निवडणूक केंद्रावरील एका कर्मचाऱ्याने केला.’’